मच्छीमार बोटीतून हातभट्टीची तस्करी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:42 AM2021-05-11T04:42:17+5:302021-05-11T04:42:17+5:30
मीरा रोड : मासेमारी बोटीच्या आड हातभट्टीच्या गावठी दारूची तस्करी केली जात असल्याचा प्रकार उत्तन सागरी पोलिसांनी उघडकीस आणला ...
मीरा रोड : मासेमारी बोटीच्या आड हातभट्टीच्या गावठी दारूची तस्करी केली जात असल्याचा प्रकार उत्तन सागरी पोलिसांनी उघडकीस आणला आहे. समुद्रात जाऊन पोलिसांनी कारवाई करून मासेमार बोटीसह मच्छीमार दाम्पत्यास अटक केली आहे.
उत्तन सागरी पोलीस ठाण्यातील शिपाई गौरव साळवी यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक इसम हा बोटीद्वारे गावठी हातभट्टीची दारू उत्तन येथे विक्रीकरिता आणणार आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत लांगी यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी रात्री उपनिरीक्षक कुरवाड व उबाळेसह साळवी आदींचे पथक भुतोडी बंदर येथे पोहोचले. हातभट्टी असलेली बोट ही समुद्रात असल्याचे कळताच तेथे जाण्यासाठी मच्छीमार सुप्रियन जुरान यांची रहस्यमयी ही मासेमारी बोट घेऊन पोलीस पथक समुद्रात गेले.
समुद्रात उभी असलेली सहारा ऊर्फ चल बेटा या बोटीवर रात्री पावणेदहाच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला असता, तीवरील राजेश डमनिक नून हा छोट्या होडीच्या साहाय्याने पळून गेला. सदर बोटीवर पोलिसांना चार मोठ्या कॅनमध्ये भरलेली हातभट्टीची ४१० लीटर इतकी दारू आढळली. पोलिसांनी दारूचा साठा व पाच लाख किमतीची मासेमारी बोट जप्त केली. सदर बोट ही राजेश व त्याची पत्नी प्रज्ञा नून या दोघांच्या मालकीची असल्याने उत्तन पोलिसांनी नून दाम्पत्यावर गुन्हा दाखल केला आहे.
मासेमारीसाठीच्या बोटीतून कायद्याने बंदी असलेल्या जीवघेण्या हातभट्टीची तस्करी केली जात असल्याच्या प्रकाराने मच्छीमारांनी संताप व्यक्त करून आरोपींना बेड्या ठोकून बोटीचा परवाना कायमचा रद्द करावा, अशी मागणी केली आहे.