भिवंडीतून भाईंदरमध्ये होतेय गावठी हातभट्टीच्या दारूची तस्करी
By धीरज परब | Published: March 23, 2024 02:24 PM2024-03-23T14:24:57+5:302024-03-23T14:25:47+5:30
भाईंदर पोलिसांनी ४०० लिटर गावठी हातभट्टी दारुसह दोघांना अटक केली आहे .
लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - कायद्याने बंदी असलेल्या गावठी हातभट्टीच्या दारूची तस्करी भिवंडीतून भाईंदर मध्ये केली जात असल्याचे उघकीस आले असून भाईंदर पोलिसांनी ४०० लिटर गावठी हातभट्टी दारुसह दोघांना अटक केली आहे .
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस आयुक्तालयातील अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर आळा बसावा म्हणून आवश्यक कारवाईचे आदेश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिले आहेत . त्या अनुषंगाने रात्री भाईंदर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक हे गस्त घालत होते . त्यावेळी हवालदार के.पी. पवार यांना त्यांच्या खबरी मार्फत माहिती मिळाली कि , एका चंदेरी रंगाच्या गाडीतून गावठी हातभट्टीची दारू मोरवा गावा च्या दिशेने जाणार आहे .
सहायक आयुक्त दीपाली खन्ना , वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुर्यकांत नाईकवाडी, पोलीस निरीक्षक विवेक सोनवणे व सुधीर गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नरोटे सह गुन्हे प्रकटीकरण शाखेचे राजेश श्रीवास्तव, के. पी. पवार, के.आर. पवार, रामनाथ शिंदे, सुशिल पवार, संजय चव्हाण यांच्या पथकाने नेताजी सुभाषचंद्र बोस मैदाना जवळ सापळा रचला . १९ मार्चच्या मध्यरात्री चंदेरी रंगाची संशयित कार येताच तिला थांबवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला . परंतु कार चालक कार पळवून नेण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी ती अडवली .
पोलिसांनी कार चालका कडे चौकशी केली असता त्याने मच्छिद्र लहु मढवी ( ४० ) रा. अंजुरगाव, भिवडी असे सांगितले . तर बाजूला बसलेल्याचे नाव सुरज सुनिल कोळी (२४ ) रा. अंजुरगाव, भिवडी असे होते . गाडीची तपासणी केली असता डिकीमध्ये प्लास्टिकच्या पिशव्यात गावठी हातभटूटीची दारु भरलेली आढळून आली. १० गोण्या भरून एकूण ४०० लिटर गावठीहातभट्टी दारू असून तिची आणि वाहनाची मिळून किंमत २ लाख १५ हजार रुपये इतकी आहे . पोलिसांनी गावठी दारू व वाहन जप्त करून मढवी व कोळी यांना अटक करत भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गावठी हातभट्टीची दारू भिवंडी वरून तस्करी करून भाईंदरच्या मोरवा गावातील गावठी दारू विक्रेत्यास देण्यासाठी आरोपी आले होते . भाईंदर पोलीस अधिक तपास करत आहेत .