राज्यात बंदी असलेल्या गुटख्याची कंटेनरमधून तस्करी : तीन कोटींचा गुटखा हस्तगत

By जितेंद्र कालेकर | Published: February 14, 2024 09:31 PM2024-02-14T21:31:15+5:302024-02-14T21:31:26+5:30

ठाणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: तीन कंटेनरही जप्त

Smuggling of Gutkha, which is banned in the state, through containers: Gutkha worth three crores seized | राज्यात बंदी असलेल्या गुटख्याची कंटेनरमधून तस्करी : तीन कोटींचा गुटखा हस्तगत

राज्यात बंदी असलेल्या गुटख्याची कंटेनरमधून तस्करी : तीन कोटींचा गुटखा हस्तगत

ठाणे: राज्यात बंदी असलेल्या गुटख्याची भिवंडीतून तस्करी करणाऱ्या ताहीर खान (४१) याच्यासह तिघांना ठाणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून दोन कोटी ९५ लाखांचा गुटखा आणि तीन कंटेनर असा तीन कोटी ५५ लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश मनोरे यांनी बुधवारी दिली.

भिवंडीतील महामार्गावरुन काही कंटेनरमधून गुटख्याची तस्करी होत असल्याची माहिती ठाणे ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी आणि डॉ. दीपाली घाटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश मनोरे आणि सहायक पोलिस निरीक्षक भास्कर जाधव यांच्या पथकाने ११ फेब्रुवारी २०२४ रोजी पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास शामीयाना धाब्याच्या समोरील रोडच्या पलीकडे नाशिक मुंबई महामार्गावर कांती मोटर्स या दुकानासमोर ताहीर खान , मोहम खान (२४) आणि जाहूल हक (३७) या तीन कंटेनर चालकांना ताब्यात घेण्यात आले.

या तिन्ही कंटेनरच्या तपासणीमध्ये त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला तसेच मानवी जीवनास धोका असलेला तंबाखूजन्य पदार्थ आणि गुटखा हस्तगत केला. या तिघांविरुद्ध भिवंडी तालुका पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यासह अन्न सुरक्षा कायदा २००६ च्या कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिन्ही आरोपींना २० फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

Web Title: Smuggling of Gutkha, which is banned in the state, through containers: Gutkha worth three crores seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.