ठाण्यात घोडबंदर रोडमार्गे कारमधून दारुची चोरटी वाहतूक करणाऱ्यास अटक; गावठी दारुसह तीन लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त
By जितेंद्र कालेकर | Published: November 7, 2024 05:24 PM2024-11-07T17:24:51+5:302024-11-07T17:24:51+5:30
राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाची कारवाई
ठाणे: ठाण्यातील घाेडबंदर रोडमार्गे एका माेटारकारमधून बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या कौशल पाटील याला अटक केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ठाण्याचे अधीक्षक प्रविण तांबे यांनी गुरुवारी दिली. पाटील याच्या ताब्यातून गावठी दारु आणि मोटारकार असा तीन लाख ३६ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल भरारी पथकाने जप्त केला.
ठाण्यातील घाेडबंदर रोड मार्गे गावठी दारुची चोरटी वाहतूक होणार असल्याची टीप राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक क्रमांक एकला मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे कोकण विभागीय उपायुक्त प्रदीप पवार आणि ठाण्याचे अधीक्षक तांबे, ठाण्याचे उपअधीक्षक वैभव वैद्य, नवी मुंबईचे अभिजित देशमुख आणि सुधीर पाेकळे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरीक्षक महेश घनशेट्टी आणि दुय्यम निरीक्षक एन. आर. महाले, जमादार बी. जी. थाेरात आदींच्या पथकाने ७ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी १.४५ वाजण्याच्या सुमारास एका संशयित मोटारकारला घाेडबंदर राेडवर थांबवून तिची तपासणी केली. तेंव्हा या माेटारकारच्या आतील बाजूस आणि डिकीमध्ये गावठी दारुने भरलेल्या प्लास्टीकच्या पिशव्या आढळल्या. त्यानंतर या पथकाने छापा टाकून ही मोटारकार ताब्यात घेतली.
याप्रकरणी दारुबंदी कायद्याखाली गुन्हा दाखल करुन नऊ गोण्यांमधील दहा लीटरच्या ३६ पिशव्यांमधील ३६० लीटर गावठी दारुसह तीन लाख ३६ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी कौशल याला अटक केली आहे. निरीक्षक घनशेट्टी हे अधिक तपास करीत आहेत.