दुर्मीळ स्टार कासवांची विक्री: आणखी एकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 08:28 PM2018-07-10T20:28:05+5:302018-07-10T20:41:44+5:30
धार्मिक विधीमध्ये शुभ मानल्या जाणाऱ्या दुर्मीळ स्टार कासवांची तस्करी करणा-या तिघांच्या अटकेनंतर नवी मुंबईतील कोपरखैरणे येथून तानाजी कळंत्रे या चौथ्या आरोपीलाही ठाणे वनविभागाने अटक केली.
ठाणे : दुर्मीळ स्टार कासवांची तस्करी करणा-या पुण्यातील एका महिलेसह तिघांना अटक केल्यानंतर सोमवारी रात्री तानाजी कंळंत्रे (३३, रा. सानपाडा, नवी मुंबई) याला ठाण्याच्या वनविभागाने अटक केली आहे. त्याच्याकडूनही चार कासवांची सुटका करण्यात आली आहे.
ठाण्याचे उपवनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर आणि सहायक वनसंरक्षक गिरिजा देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष कंक आणि ठाण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी दिलीप देशमुख यांच्या पथकाने गेल्या दोन दिवसांमध्ये ही कारवाई केली. ट्रॅफिक कंट्रोल ब्युरो या दिल्लीच्या वन्यजीव गुप्तवार्ता विभागाने दिलेल्या माहितीच्या आधारे वाईल्ड लाईफ वेल्फेअर असोसिएशन या ठाण्यातील संस्थेच्या मदतीने केलेल्या कारवाईत सुरुवातीला मृगन नाडार याला ठाणे रेल्वे स्थानक परिसरातून शनिवारी वन विभागाच्या अधिकाºयांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून २० स्टार कासवे जप्त करण्यात आली. त्याच्याच चौकशीत अशोक उर्फ आकाराम शिंदे (२८, रा. वाशी) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडूनही चार कासवांची सुटका केली. या दोघांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पुण्यातून शुभांगी अत्रे उर्फ मंजिरी कत्रे हिला सोमवारी सायंकाळी तर कोपरखैरणे येथून तानाजी कळंत्रे याला सोमवारी रात्री अटक केली. मंजिरी आणि नाडार हे दोघेही या स्टार कासवांच्या तस्करीतील सूत्रधार असून त्यांच्याकडून आतापर्यंत ३० हून अधिक कासवांची सुटका केल्याची माहिती वनअधिका-यांनी दिली. तानाजीने अशोकला प्रती कासव ३०० रुपये प्रमाणे ११ कासवांची विक्री केली होती. तर प्रती कासव ४०० रुपये प्रमाणे अशोक त्यांची विक्री करण्याच्या बेतात असतांनाच वनविभागाने त्याला नाटयमयरित्या अटक केली.