मण्यारचा दंश झालेल्या आजीबार्इंना जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 05:21 AM2018-08-18T05:21:24+5:302018-08-18T05:21:38+5:30
मण्यार सारख्या विषारी सर्पाने शहापुरातील ६२ वर्षीय आजीबार्इंना झोपेत दंश केला होता. त्यांना उपचारार्थ ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. यावेळी तेथील डॉक्टरांनी कृत्रिम श्वास नलिका आणि औषधोपचार करून आजीबार्इंना मृत्यूच्या दारातून बाहेर काढले.
ठाणे - मण्यार सारख्या विषारी सर्पाने शहापुरातील ६२ वर्षीय आजीबार्इंना झोपेत दंश केला होता. त्याचे विष त्यांच्या अंगात भिनल्याने ह्रदयाचे ठोकेही हळूहळू कमी झाले. त्यामुळे त्यांना उपचारार्थ ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. यावेळी तेथील डॉक्टरांनी कृत्रिम श्वास नलिका आणि औषधोपचार करून आजीबार्इंना मृत्यूच्या दारातून बाहेर काढले. आता आजीबार्इंची प्रकृती स्थिर आहे.
अनुसया वरटे (६२) असे त्यांचे नाव असून त्या शहापूर तालुक्यातील हुताडी येथील रहिवासी आहेत. शेती हेच या कुटुंबाचे उदरनिर्वाह साधन असल्याने शेतावरच राहतात. घरात शिरलेल्या मण्यार या सर्पाने अनुसया यांना मध्यरात्री झोपेत दंश केला. कुटुंबाने त्यांना रुग्णालयात नेले. परंतु, विष पसरू लागल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक झाली. त्यामुळे त्यांना १३ आॅगस्ट रोजी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात आणल्यावर डॉक्टरांनी तपासणी केल्यावर त्यांच्या ह्रदयाचे ठोके हळूहळू कमी होण्यास सुरुवात झाल्याचे डॉ. नेताजी मुळीक यांच्या निदर्शनास आले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तेथील डॉक्टरांनी कृत्रिम श्वसन नलिका लावून औषधोपचार सुरू केले. रूग्णालयातील परीसेविकांच्या मेहनतीने आजींना जीवदान मिळाले.
रुग्णालयात आणलेल्या आजींची प्रकृती अतिशय गंभीर होती. त्यांचे वय जास्त असल्याने एकप्रकारची जोखीम होती. पण, औषधोपचारांना त्यांनी दिलेला प्रतिसाद आणि त्यांचे नशीब बलवत्तर असल्याने त्या बचावल्या.
- डॉ. नेताजी मुळीक,
वरिष्ठ फिजिशियन,जिल्हा सामान्य रूग्णालय, ठाणे