महासभा सुरू असतानाच नगरसेविकेच्या घरात निघाला साप; अग्निशमन दलाने स्वतःचेच आदेश मोडून धाव घेत पकडला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 09:05 PM2021-12-24T21:05:32+5:302021-12-24T21:11:19+5:30

मीरा भाईंदर परिसरात मोठ्या संख्येने अजगर, साप आदी वन्य जीव रहिवासी इमारती अथवा नागरिक्षेत्रात आढळून येतात.

The snake enter the corporator Prabhat patil's house while the meeting | महासभा सुरू असतानाच नगरसेविकेच्या घरात निघाला साप; अग्निशमन दलाने स्वतःचेच आदेश मोडून धाव घेत पकडला

सांकेतिक छायाचित्र

Next

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या शुक्रवारच्या ऑनलाईन तहकूब महासभे दरम्यान ज्येष्ठ भाजप नगरसेविका प्रभात पाटील यांच्या बंगल्यात साप शिरला. पाटील यांनी महासभेतच हा मुद्दा मांडल्यानंतर अग्निशमन दलाने धाव घेऊन तो साप पकडला. मात्र, साप आदी वन्यजीव आढळल्यास वन विभागाकडे संपर्क साधण्याच्या महापालिकेनेच जारी केलेल्या आदेशाचे अग्निशमन दलाने उल्लंघन करत नगरसेवकासाठी धाव घेतली. मग आता सामान्य नागरिकांसाठीसुद्धा अशीच तत्परता पालिका दाखवणार का? असा प्रश्न स्वतः पाटील यांनीच केला आहे . 

मीरा भाईंदर परिसरात मोठ्या संख्येने अजगर, साप आदी वन्य जीव रहिवासी इमारती अथवा नागरिक्षेत्रात आढळून येतात. साप आदी दिसल्यास लोक घाबरत असल्याने अग्निशमन दलास पाचारण करून त्यांना पकडले जायचे. परंतु महापालिकेने नुकताच आदेश जारी करून या पुढे साप आदी वन्यजीव आढळून आल्यास वन विभागास संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. तसेच या पुढे साप आदी पकडण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान येणार नाहीत, असे स्पष्ट केले आहे. 

कारण अग्निशमन दलाचे जवान हे साप आदी वन्यजीव पकडताना त्यांना नीट हाताळत नसल्याने वन्यजीव जखमी झाल्याचे तसेच वन्यजीव पकडून फोटोसेशन करणे आदी आरोप तसेच काही तक्रारी आल्याने वन विभागाने पालिकेस वन्यजीव पकडू नये असे निर्देश दिले . 

तोच शुक्रवारी ऑनलाईन महासभा सुरु असताना नगरसेविका प्रभात पाटील यांच्या भाईंदर, इंद्रलोक येथील बंगल्यात साप आल्याचा मुद्दा त्यांनी महासभेत उपस्थित केला. यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांच्या बंगल्यात धाव घेऊन साप पकडून नेला. 

पाटील म्हणाल्या, माझ्या बंगल्यात तसेच परिसरात नेहमीच साप येत असतात. लोक घाबरत असल्याने अग्निशन दलाचे जवान त्यांना कळवताच साप पकडून नेत होते. पण आता अग्निशमन दल साप पकडणार नसल्याने वन विभागास संपर्क केला असता त्यांचे क्रमांक लागत नाहीत. वास्तविक पालिकेने पर्याय म्हणून सर्पमित्र तैनात केले पाहिजे होते. सर्पमित्र व वन विभागासाठी जागा दिली पाहिजे. परंतु कोणतीच पर्यायी व्यवस्था न करताच पालिकेने असा निर्णय घेऊन शहरातील नागरिकांना वाऱ्यावर सोडले आहे. मी नगरसेविका आहे म्हणून अग्निशन दल धावून आले. पण सामान्य नागरिकांसाठी धावून जाणार का ? हाच खरा प्रश्न आहे. 

Web Title: The snake enter the corporator Prabhat patil's house while the meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.