रेल्वे पादचारी पुलावर साप, प्रवाशांचा थरकाप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 04:33 PM2018-10-15T16:33:10+5:302018-10-15T16:34:27+5:30
अंबरनाथ रेल्वे स्थानकावरील पादचारी पुलावर साप असल्याची तक्रार प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडे केली.
अंबरनाथ : अंबरनाथ रेल्वे स्थानकावरील पादचारी पुलावर साप असल्याची तक्रार प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडे केली. याबाबतची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी पूल प्रवाशांसाठी काही वेळासाठी बंद केला. सापाला पकडण्यासाठी लागलीच सर्पमित्राला बोलावण्यात आले. मात्र हा साप लोखंडी रॉडमध्ये अडकल्याने त्याला काढण्यासाठी सर्पमित्राला मोठी कसरत करावी लागली. अखेर अर्धा तासाच्या अथक प्रयत्नानंतर सापाला जिवंत पकडण्यात सर्पमित्राला यश आले.
सोमवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास कामावर जाणा-या चाकरमान्यांची रेल्वे पादचारी पुलावर नेहमीप्रमाणे गर्दी झाली होती. प्रत्येक कर्मचारी आणि प्रवासी आपल्या तंदरीत या पुलावरुन जात होते. मात्र कोणत्याच प्रवाशाला या पुलावर सर्प असल्याचे जाणवले नाही. मात्र पुलावर उभ्या असलेल्या एका प्रवाशाला पुलाच्या पाय-यांच्या शेजारीच एक साप असल्याचे लक्षात आले. त्यांनी लागलीच आरडाओरडा करत याची माहिती रेल्वे प्रशासनाला दिली. या साप नेमका विषारी आहे की बिनविषारी आहे याची कल्पना पोलिसांनाही न आल्याने त्यांनी सुरक्षेच्या हेतूने या पुलावरील प्रवाशांची ये-जा बंद करण्यात आली.
तसेच सर्पमित्र प्रकाश गोयल याला बोलाविण्यात आले. गोयल यांनी या सापाला काढण्याचा प्रयत्न केला असता हा साप पाय-यांच्या शेजारी असलेल्या लोकंडी रॉडमध्ये अडकून पडला होता. त्यामुळे त्याला सुखरुप काढणे अवघड होते. त्यामुळे गोयल यांनी या सर्पाला काढण्यासाठी तब्बल अर्धातास लावल. मात्र या सर्पाला होणतीही इजा न होता हा सर्प जिवंत पकडला गेला. डुरक्या घोणस नावाने हा सर्प ओळखला जात असून हा बिन विषारी सर्पापैकी एक आहे. हा सर्प काढल्यावर प्रवाशांनी आणि रेल्वे प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला.