विद्यापीठाचे कुलगुरूपद म्हणजे काटेरी मुकुट;स्नेहलता देशमुख यांचे मत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 01:35 AM2020-02-07T01:35:05+5:302020-02-07T01:35:29+5:30
डोंबिवलीमध्ये कर्तृत्ववान व्यक्ती, संस्थांच्या कार्याचा गौरव
डोंबिवली : ज्या कार्यक्रमाची सुरुवात सुरांनी होते, तो कार्यक्रम चांगलाच होतो. सुरांचा राग मन रिझवितो आणि मनातील राग मन झिजवितो. मनातील राग आवरायला हवा, ही गोष्ट मी कुलगुरू झाल्यावर शिकले आहे. कुलगुरू असताना मिनिटामिनिटाला राग येईल, असे क्षण होते. कुलगुरूपद म्हणजे काटेरी मुकुट असतो, असे मत मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख यांनी व्यक्त केले.नागरी अभिवादन न्यास आणि डोंबिवलीतील ४६ संस्थांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या मंचातर्फे चार ज्येष्ठ आणि दोन तरु णांचा नुकताच सत्कार करण्यात आला. टिळकनगर विद्यामंदिरच्या प्रांगणात हा कार्यक्रम झाला. यावेळी देशमुख बोलत होत्या.
डोंबिवलीच्या जडणघडणीत हातभार लावल्याबद्दल जननी आशीष अनाथ बालक संस्थेच्या संस्थापक डॉ. कीर्तिदा प्रधान, माफक दरात किंवा विनामूल्य वैद्यकीय उपचार करणाऱ्या मानव कल्याण केंद्राचे संस्थापक डॉ. मूलचंद छेडा, संत साहित्य अभ्यासक व लेखक वामनराव देशपांडे, डोंबिवली पॅसेंजर्स असोसिएशनचे अध्यक्ष बबनराव लोहोकरे, चित्रपटांचे सिनेमाटोग्राफर केदार फडके आणि रांगोळीकार आणि कथ्थक नर्तक उमेश पांचाळ यांचा सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर तीन वर्षांत ७० टन प्लास्टिक ३० मोहिमांमधून जमा करून इंधन बनविण्यासाठी स्वखर्चाने जेजुरीला पाठविणाºया ऊर्जा फाउंडेशनच्या स्नेहल दीक्षित यांचा गौरव करण्यात आला.
देशमुख म्हणाल्या, कुलगुरूपदावर मी पाच वर्षे टिकून होते. स्वत:ला कुठेही खरचटू न देता या पदावर राहिले. त्याचे कारण मी कधीही कुणाचा हेवा केला नाही. त्यामुळे या पदातून मी तरून गेले. कुलगुरूपदाचा मुकुट जसाच्या तसा दुसºया कुलगुरूला मला देता आला. माझ्या आईने मला कितीही अडचणी आल्या, तरी नदीच्या प्रवाहाप्रमाणे वाहत राहिले पाहिजे. आपल्या मार्गात अडचणी आल्या की, हळूच मार्ग बदलून पुढे जायचे, याची शिकवण दिल्याचे त्या म्हणाल्या.
सचिन बोडस यांनी प्रास्ताविक, सुप्रसिद्ध गायक विनायक जोशी यांनी निवेदन केले, तर सीए जयंत फलके यांनी आभार मानले. यावेळी लक्ष्मीनारायण संस्थेचे माधव जोशी व न्यासाचे अध्यक्ष सुधीर जोगळेकर आदी मान्यवर उपस्थित होते. आमदार रवींद्र चव्हाण, नगरसेवक संदीप पुराणिक आणि खुशबू चौधरी, ख्यातनाम गायक वसंतराव आजगावकर, श्रीकांत पावगी, सुधाताई म्हैसकर यावेळी उपस्थित होते.