पत्नीमुळे चेन स्नॅचर झाला पोलिसांचा ‘गुलाम’; सात वर्षांपासून होता फरार, खडकपाडा पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 12:03 AM2019-05-14T00:03:11+5:302019-05-14T00:03:26+5:30
कल्याण आणि ठाणे शहरातील चार पोलीस ठाण्यांत मोक्कांतर्गत गुन्हे दाखल असलेला चेन स्नॅचर गुलाम उर्फ अब्बास मौसम इराणी उर्फ जाफरी (२८) याला खडकपाडा पोलिसांनी रविवारी सायंकाळी आंबिवली परिसरात सापळा लावून अटक केली.
कल्याण : कल्याण आणि ठाणे शहरातील चार पोलीस ठाण्यांत मोक्कांतर्गत गुन्हे दाखल असलेला चेन स्नॅचर गुलाम उर्फ अब्बास मौसम इराणी उर्फ जाफरी (२८) याला खडकपाडा पोलिसांनी रविवारी सायंकाळी आंबिवली परिसरात सापळा लावून अटक केली. तो परिसरात येणार असल्याची माहिती त्याच्याच पत्नीने पोलिसांना दिल्याने सात वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा गुलाम पोलिसांच्या हाती लागला. कल्याण न्यायालयात सोमवारी हजर करण्यात आलेल्या गुलामला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
कल्याणजवळील आंबिवली परिसरात असलेल्या इराणी वस्तीमध्ये राहणाऱ्या गुलाम याने दहा दिवसांपूर्वी त्याच्या पत्नीसह सासूला मारहाण करत तेथून पळ काढला. याप्रकरणी त्याच्याविरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेर पत्नीला मारहाण केल्याचा गुन्हा दाखल होताच पोलिसांनी त्याचा मागोवा घेत तपास सुरू केला. रविवारी आंबिवली येथे गुलाम येणार असल्याची माहिती त्याच्या पत्नीने खडकपाडा पोलिसांना दिली. या माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक धर्मेंद्र आवारे यांच्या पथकाने त्याला अटक केली.
चार वेळा केली होती मोक्काअन्वये कारवाई
गुलाम हा सराईत चेन स्नेचर असून त्याच्यावर २२ गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर चार वेळा मोक्का लावण्यात आला होता. त्याच्याविरोधात बाजारपेठ, नारपोली, वागळे इस्टेट, वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त अनिल पोवार यांनी दिली.
गुलामने काही महिन्यांपूर्वी इराणी वस्ती परिसरात दुकान टाकले होते. मात्र, छाप्याची खबर मिळताच, तो पसार होत होता. पोलीस त्याच्या मागावर होते. अखेर सात वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाºया गुलामला पकडण्यात पोलिसांना यश आले.