...तर दरदिवशी १३ लाखांचा लावला जाणार दंड, डायघर प्रकल्पाच्या ठेकेदाराला पालिकेने बजावली नोटीस
By अजित मांडके | Published: October 3, 2023 04:59 PM2023-10-03T16:59:10+5:302023-10-03T16:59:27+5:30
भंडार्ली येथे एक वर्षाकरीता कचरा डम्प केला जाणार होता. परंतु वर्ष उलटल्यानंतरही त्याठिकाणी आजही कचरा टाकला जात आहे.
ठाणे : भंडार्ली येथील कचरा प्रकल्प बंद करुन डायघर येथे कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प महापालिकेने हाती घेतला आहे. ३० सप्टेंबर पर्यंत याठिकाणी कचरा प्रकल्प सुरु होणे अपेक्षित होते. परंतु तो सुरु न झाल्याने भांडार्ली येथील स्थानिकांच्या रोषाला पालिकेला सामोरे जावे लागले आहे. असे असतांनाही पालिकेने आता २० ऑक्टोबर नंतर येथील प्रकल्प सुरु करण्याची तयारी दर्शविली आहे. परंतु वेळेत प्रकल्प सुरु न केल्याने पालिकेच्या घनकचरा विभागाने संबधींत ठेकेदाराला नोटीस बजावली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यातही २० आॅक्टोबरनंतर प्रकल्पाच्या ठिकाणी कचरा गेला नाही तर दरदिवशी १३ लाखांचा दंड वसुल केला जाणार आहे.
भंडार्ली येथे एक वर्षाकरीता कचरा डम्प केला जाणार होता. परंतु वर्ष उलटल्यानंतरही त्याठिकाणी आजही कचरा टाकला जात आहे. येथील डम्पींग १५ सप्टेंबर पर्यंत बंद केले जाईल असे आश्वासन पालिकेने दिले होते. परंतु ३० सप्टेंबर नंतरही डम्पींग बंद झालेले नाही. त्यामुळे स्थानिकांनी दोन दिवसापूर्वी कचºयाच्या गाड्या रोखल्या होत्या. तसेच सोमवारी महापालिका आयुक्तांची भेट देखील घेतली आहे. त्यानंतर आता २५ आॅक्टोबर नंतर एकही गाडी येथे जाणार नसल्याचे लेखी आश्वासन पालिकेने स्थानिकांना दिले आहे.
परंतु दुसरीकडे डायघर प्रकल्पाचे काम रखडल्यानेच पालिकेला तारीख पे तारीख द्यावी लागत आहे. त्यामुळे काम रखडवणाºया ठेकेदाराला पालिकेच्या घनकचरा विभागाने २ ऑक्टोबर रोजी नोटीस बजावली असल्याची माहिती समोर आली आहे. या ठेकेदाराला वाढीव ३० सप्टेंबरची मुदत देण्यात आली होती. परंतु त्यानंतरही काही तांत्रिक अडचणींमुळे या ठिकाणी प्रकल्प सुरु करता आलेला नाही. त्यातही या कचरा प्रकल्पाच्या ठिकाणी वीजेचा ट्रान्सर्फमा बसविण्यात आला आहे. जो चार्जींगवर चालणार आहे, त्यासाठी चार्जींग मिळत नसल्यानेही काहीसा विलंब झाल्याचे दिसून आले. तसेच इतरही काही तांत्रिक अडचणी आल्याचे पालिकेचे म्हणने आहे. परंतु असे असले तरी ठेकेदाराची देखील जबाबदारी होती. असे सांगत पालिकेने त्याला नोटीस बजावली आहे. त्यातही आता निर्धारीत वेळेत प्रकल्प सुरु झाला नाही तर त्याच्याकडून १३ लाखांचा दंड वसुल केला जाईल असा इशाराही पालिकेने दिला आहे.
डायघरसाठी १४ वर्षापासून प्रयत्न
डायघर प्रकल्प लवकर मार्गी लागावा यासाठी पालिका प्रशासनाचे गेल्या १४ वर्षांपासून प्रयत्न सुरु आहेत. त्यानुसार डायघर येथे कचºयापासून वीज निर्मितीचा प्रकल्प पालिकेने राबविण्याचा निर्णय घेतला होता. या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता बांधणी, वृक्ष लागवड आण िसंरक्षक भिंतीचेही काम पूर्ण झाले आहे. येथील रहिवाशांसाठी असलेला रस्ता, प्रकल्पाच्या ठिकाणी जाणाºया रस्त्याचे कामही पूर्ण झाले आहे. तसेच या प्रकल्पात महत्वाच्या मानल्या जाणाºया मशिनचे सादरीकरण झाले आहे. ऑस्ट्रेलिया आणि जर्मनीतून या मशिन येणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. आता त्या मशनीरी देखील देखील डम्पींगच्या जागी आल्याचा दावा करण्यात आला आहे.