... तर यंत्रमाग व्यवसायाचे कंबरडे मोडेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:36 AM2021-04-05T04:36:16+5:302021-04-05T04:36:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भिवंडी : कोरोना संकटामुळे मागील वर्षभरापासून यंत्रमाग व्यवसायास घरघर लागली आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये कोरोना आटोक्यात आल्याने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : कोरोना संकटामुळे मागील वर्षभरापासून यंत्रमाग व्यवसायास घरघर लागली आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये कोरोना आटोक्यात आल्याने व त्यानंतर दसरा, दिवाळीसारखे सण लागोपाठ आल्यामुळे लॉकडाऊनमुळे डबघाईला आलेल्या यंत्रमाग व्यवसायाची गाडी रुळावर यायला लागली होती तोच मार्च महिन्यापासून शहरासह राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने डोके वर काढले आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता भिवंडी मनपा प्रशासनाने शहरात कडक निर्बंध लागू केले आहेत.
लॉकडाऊन केल्यास भिवंडीतील यंत्रमाग व्यवसायाची अक्षरशः दाणादाण उडणार असून व्यवसायाचे पार कंबरडेच मोडून जाईल. मागील वर्षभर लॉकडाऊन काळात यंत्रमाग व्यावसायिकांनी आपल्याकडे असलेल्या जमापुंजीत कामगारांना किमान पोटभर जेवण तरी दिले होते मात्र वर्षभरापासून असलेल्या बंद मुळे आता अनेक यंत्रमाग व्यावसायिक कर्जबाजारी झाले असल्याने बंदच्या काळात कामगारांना जेवण व भत्ता देण्यात असमर्थ ठरणार असल्याने येथील यंत्रमाग कामगारांवर उपासमारीची वेळ येणार आहे.
यंत्रमाग व्यावसायिकांना आवश्यक असलेल्या यार्नच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे . त्यामुळे व्यावसायिकांना चढ्या भावाने यार्नची खरेदी करावी लागत आहे. प्रती किलो ३५० रुपयाला मिळणारा यार्न सध्या ६७० रुपयांना खरेदी करावा लागत आहे. तसेच वीजबिल व यंत्रमाग कारखान्याचा इतर खर्च या सर्व बाबी यंत्रमाग मालकांना सहन कराव्या लागत आहेत. त्यातच जर आता लॉकडाऊन झाला तर यंत्रमाग व्यावसायिक कर्जबाजारी होतील व कामगारांवरही उपासमारीची वेळ येईल. ज्यामुळे येथील यंत्रमाग व्यवसायाचे कंबरडे मोडणार असल्याची भीती यंत्रमाग व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.
व्यावसायिक पाळत आहेत नियम
सरकारच्या नियमांचे पालन करण्यास यंत्रमाग व्यावसायिक तयार आहेत. ते नियमही पाळत आहेत, मात्र असे असतानाही जर लॉकडाऊन झालाच तर मात्र यंत्रमाग व्यावसायिक पूर्णतः कर्जबाजारी होईल व यंत्रमाग व्यवसायही त्यामुळे डबघाईला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी प्रतिक्रिया यंत्रमाग व्यावसायिक भूषण रोकडे यांनी दिली आहे.