"...मग शिवसेनाप्रमुखांना अटक करणाऱ्या भुजबळांसोबत बसताना तुम्हाला काहीच वाटत नाही का?" सुभाष साबणेंचा उद्धव ठाकरेंना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 11:07 AM2022-06-27T11:07:14+5:302022-06-27T11:10:16+5:30
Subhash Sabane, Uddhav Thackeray: भाजपासोबत पुन्हा युती करण्याची शिंदे गटाची मागणी फेटाळून लावताना उद्धव ठाकरे यांनी माझ्या आणि माझ्या कुटूंबाच्या विरोधात बोलणाऱ्या किरीट सोमया यांच्या मांडीला मांडी लावून मी कसं बसू असा सवाल केला होता, त्याला आता शिवसेनेचे माजी आमदार आणि आताचे भाजपा नेते सुभाष साबणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
ठाणे - गेल्या आठवड्यात शिवसेनेत झालेल्या बंडामुळे राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ४० हून अधिक सेना आमदार बंड करून गुवाहाटीमध्ये एकवटले आहेत. तर दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत ही बंडाळी मोडून काढण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी करत आहेत. दरम्यान, भाजपासोबत पुन्हा युती करण्याची शिंदे गटाची मागणी फेटाळून लावताना उद्धव ठाकरे यांनी माझ्या आणि माझ्या कुटूंबाच्या विरोधात बोलणाऱ्या किरीट सोमया यांच्या मांडीला मांडी लावून मी कसं बसू असा सवाल केला होता, त्याला आता शिवसेनेचे माजी आमदार आणि आताचे भाजपा नेते सुभाष साबणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
एकनाथ शिंदे यांना समर्थन देण्यासाठी ठाण्यात आलेलेल सुभाषण साबणे म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात की, माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या विरोधात बोलणाऱ्या किरीट सोमया यांच्या मांडीला मांडी लावून मी कसं बसू? पण उद्धव ठाकरेजी शिवसेनाप्रमुखाना अटक करून नेणाऱ्या छगन भुजबळ यांच्या मांडीला मांडी लावून बसताना, त्यांना घरी जेवायला बोलावताना आपल्याला काहीच वाटत नाही का? असा सवाल सुभाष साबणे यांनी विचारला आहे. छगन भुजबळांनी बाळासाहेब ठाकरे यांना अटक केल्यावर विधानसभेत याविरोधात जाब विचारल्याबद्दल सुभाष साबणे यांनी वर्षभर निलंबनाची कारवाई झेलली होती.
शिवसेनाप्रमुखांना अटक करून नेणाऱ्या छगन भुजबळ यांच्या मांडीला मांडी लावून बसताना, त्यांना घरी जेवायला बोलावताना आपल्याला काहीच वाटत नाही का? सुभाष साबणेंचा उद्धव ठाकरेंना सवाल (व्हिडीओ - विशाल हळदे) pic.twitter.com/t7Fe7L5cdA
— Lokmat (@lokmat) June 27, 2022
सुभाष साबणे पुढे म्हणाले की, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत अनैसर्गिक आघाडी करून आधी यवतमाळ जिल्ह्यात शिक्षक मतदारसंघात शिवसेनेच्या श्रीकांत देशपांडे यांच्या विरोधात अनिल देशमुख यांच्या मेव्हण्याला उमेदवारी देऊन त्यांचा पराभव करण्यात आला. त्यानंतर पंढरपूरची पोटनिवडणुक लागली तेव्हा त्यातही शिवसेनेची जागा राष्ट्रवादीला सोडण्यात आली. देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत पुन्हा तेच करण्यात आलं आणि अलीकडे कोल्हापूर पोटनिवडणुकीत राजेश श्रीरसागर यांच्यासारखा कार्यकर्ता असतानाही ती जागा काँग्रेसला सोडण्यात आली.
दरम्यान एकनाथ शिंदे यांचं हे बंड नसून शिवसेनेच्या भल्यासाठी दिलेला लढा आहे. त्यामुळे सर्वसामान्य शिवसैनिकांनी भावनिक आवाहनाला न भुलता त्यांच्या लढ्याला जाहीर समर्थन द्यावं, असं आवाहनही सुभाष साबणे यांनी यावेळी केलं.