...तर आपल्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये जावे लागेल, साहित्यिक राजन गवस यांना चिंता
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 01:12 PM2023-07-31T13:12:45+5:302023-07-31T13:12:53+5:30
आज चेहरे नसलेला शत्रू हजारो हातांनी सामान्य माणसाला गिळत आहे.
ठाणे : आपण महाराष्ट्र म्हणून आजारी आहोत, याकडे आपण गांभीर्याने पाहिले नाही तर आपल्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती व्हावे लागेल, अशी चिंता कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप), आनंद विश्व गुरूकुल, शारदा एज्युकेशन ट्रस्ट, डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आयोजित जिल्हा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ कादंबरीकार राजन गवस यांनी व्यक्त केली.
आज चेहरे नसलेला शत्रू हजारो हातांनी सामान्य माणसाला गिळत आहे. तेव्हा जबाबदारी लिहिणाऱ्यावर येते. त्यामुळे या आजारी महाराष्ट्राचे किमान संवेदनशील महाराष्ट्रात रूपांतर करणे ही आजची गरज आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आनंद विश्व गुरूकुल विधी महाविद्यालयाच्या जनकवी पी. सावळाराम सभागृहामध्ये रविवारी हे संमेलन झाले. गवस म्हणाले की, गेली ४४ वर्षे मी लिहित आहे, परंतु कधी नव्हे तो महाराष्ट्र हा आजारी पडला आहे. हा आजारांचा प्रदेश आहे.
सामान्यांच्या प्राथमिक गरजा भागविणारी कल्याणकारी राज्याची संकल्पना होती, परंतु या संकल्पनेपासून आपण खूप दूर जाऊन नव्या भांडवली व्यवस्थेत आहोत. जिथे महाराष्ट्रातील प्राथमिक आरोग्य केंद्रेही मरणपंथावर आहेत. मल्टिस्पेशालिटीने गोरगरिबांचे शोषण केले आहे. शिक्षणाची मंदिरे न राहता तिथे दुकानदारी सुरू झाली आहे. तिसऱ्या बाजूला संपूर्ण शेतीत उद्ध्वस्तता आहे. नद्यांची गटारे झाली आहेत, महानगरांत येणाऱ्या सगळ्या महामार्गांमुळे असंख्य शेतकरी भूमिहीन होत आहेत. पर्यावरणाचा ऱ्हास होत असून, यात गोरगरीब मरत आहेत. या गोरगरिबांचा श्वास आपल्या साहित्याच्या केंद्रापर्यंत कधीतरी यायला हवा. साहित्यिकाच्या मनात या संपूर्ण व्यवस्थेचे प्रश्न येणे गरजेचे आहे. सामान्यांचा विचार करणारा आणि भांडवलदारी व्यवस्थेचे समर्थन करणारा अशा दोन विभागांमध्ये समाज विभागला गेला आहे. याकडे पाहताना समाजाचा घटक म्हणून मी अस्वस्थ आहे, असेही गवस यांनी सांगितले.
‘कोमसाप’चे संस्थापक अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष बाळ कांदळकर, विलास जोशी, विलास ठुसे व आदी उपस्थित होते. सुरुवातीला ‘बहर’ स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
माणूस वजा केला तर साहित्यामध्ये काहीच उरत नाही. माणूस हा साहित्याचा केंद्रबिंदू असतो. माणूस आणि त्याच्या भोवतालकडे पाहणे ही साहित्यिकाची अट असावी. पुणे, मुंबईत लिहिणारे लेखक आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये लिहिणाऱ्या साहित्यिकांची केंद्रे पाहिली तर साहित्याची केंद्रे ही सरकत चालली आहेत.
- राजन गवस, संमेलनाध्यक्ष, ठाणे जिल्हा साहित्य संमेलन