...तर आम्ही कोणाला न घाबरता रॅली काढून सभा घेणार - वारीस पठाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:48 AM2021-09-10T04:48:24+5:302021-09-10T04:48:24+5:30
भिवंडी - भाजप जनआशीर्वाद यात्रा काढते. राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पार्टीसह शिवसेना रॅली व सभा घेतात, तेव्हा त्यांच्या सभेला गर्दी ...
भिवंडी - भाजप जनआशीर्वाद यात्रा काढते. राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पार्टीसह शिवसेना रॅली व सभा घेतात, तेव्हा त्यांच्या सभेला गर्दी झालेली चालते; मात्र त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत. तर मग आम्हीसुद्धा कोणाला न घाबरता रॅली काढून सभा घेणार, आम्हाला कोणीही रोखू शकत नाही, असे वक्तव्य एमआयएमचे माजी आमदार वारीस पठाण यांनी बुधवारी केले. या वक्तव्याने एमआयएमने भिवंडी पोलिसांना खुले आव्हानच दिले आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वीच सर्वच राजकीय पक्षांना रॅली व सभा, मेळावे घेण्यास बंदी घातली आहे; मात्र तरीही भिवंडीत विविध पक्षांची शक्ती प्रदर्शने सुरूच आहेत.
जनआशीर्वाद यात्रेच्या आयोजकांवर भिवंडी शहरातील ५ विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले. त्यानंतर मागील शुक्रवारी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या रॅली व भिवंडी महापालिका मुख्यालयातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची हुल्लडबाजी करून कोरोना नियमाचे उल्लंघन केले. त्यापाठोपाठ समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी शनिवारी जोरदार शक्ती प्रदर्शन करून शहरात रॅली काढली होती. दोन्ही रॅलीमध्ये हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांचा जमाव होता. तर मुख्यमंत्र्याच्या आव्हानानंतरही बुधवारी सायंकाळी भिवंडीत एमआयएमचे माजी आमदार वारीस पठाण यांच्या रॅली व सभेत कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झाली व सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. अनेकांच्या तोंडाला मास्कही दिसून आले नाही.