...तर समजेल खरा भ्रष्टाचाराचा सरदार कोण? जितेंद्र आव्हाड यांचा पलटवार

By अजित मांडके | Published: July 22, 2024 05:17 PM2024-07-22T17:17:21+5:302024-07-22T17:18:01+5:30

Jitendra Awhad : ठाण्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत जितेंद्र आव्हाड बोलत होते.

...so who is the real leader of corruption? Amit shah Counterattack by Jitendra Awhad | ...तर समजेल खरा भ्रष्टाचाराचा सरदार कोण? जितेंद्र आव्हाड यांचा पलटवार

...तर समजेल खरा भ्रष्टाचाराचा सरदार कोण? जितेंद्र आव्हाड यांचा पलटवार

ठाणे : शरद पवार यांच्यावर आरोप करणाऱ्या अमित शहा यांनी आरशात बघावे, आपल्या मागे पूर्ण मंत्रिमंडळातील सदस्य उभे करावेत. मग, समजेल भ्रष्टाचाराचा सरदार कोण आहे ते! अशी टीका शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली. ईडी, सीबीआय वापरून पक्ष कसे फोडले, ७०  हजार कोटींचा आरोप कोणावर झाला होता, आणि सध्या ते कुठे आहेत? हे त्यांनी जाहीर करावे. शरद पवार या नावावर टीका केल्याशिवाय आपले अस्तित्व दाखवता येत नाही, हे अमित शहा यांनाही उमगले आहे. याच शहा यांनी इलेक्ट्रोल बाँड,  सीबीआय यावरही कधीतरी बोलावे, असेही ते म्हणाले.

ठाण्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. रोड सेफ्टी नावाचा प्रकारच सध्या अस्तित्वात राहिलेला नाही. सुमारे ८००-८०० पोलिसांना संरक्षणात गुंतवून ठेवले आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहतुकीचे नियोजन होणार कसे? मग, हिट अँड रन होणार नाही तर काय? वरून पोलिसांना गुन्हा दाखल न करण्याचे आदेश येणार, अशा स्थितीत सामान्य नागरिक कसे काय सुरक्षित राहणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 

हल्ली पीए, कार्यकर्ते पोलिसांवर दबाव टाकून गुन्हा नोंदवावा किंवा नोंदवू नये, असे आदेश देत आहेत. पुणे, वरळीत राजकीय हस्तक्षेप झाला होता. आता मुलुंड प्रकरणात गुन्हाच दाखल केला जात नव्हता. एकीकडे कोणाला एमपीडीए लावायचा, कुणाला तुरूंगात टाकायचे, यासाठी फोन केले जातात. चौकशी पारदर्शक होत नाही. गुन्हेगार वाचविले जातात. मग, काही होत नाही म्हणून मग्रुरी येते आणि गुन्हे वाढत जातात. हे थांबलं पाहिजे.
     
विशाळगड आणि गजापूर दंगलीबाबतही आव्हाड यांनी शासन - प्रशासनाला खडे बोल सुनावले. स्थानिकांनी तहसीलदार, पोलीस प्रशासनाला कळवूनही पोलीस बंदोबस्त देण्यात आला नाही. त्यामुळे स्वत:ला शिवभक्त म्हणवून घेणाºयांनी आधी गडावर जाऊन धिंगाणा घातला आणि त्यानंतर गजापूरात पोलीस अधीक्षकांच्या समोरच लूटमार केली. विशाळगडावरील वास्तव्यात छत्रपती शिवाजी महाराज यांनीही मशिदीशेजारी मुक्काम केला होता आणि त्यांच्या नावाने दंगल पसरविली जात आहे. ही दंगल पसरवणारे कसले शिवभक्त ते तर दरोडेखोर आहेत.

आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शरद पवारांची भेट घेत आहेत, याबाबत विचारले असता, शरद पवार हे देशातील सर्वात प्रगल्भ आणि परिपक्व नेते आहेत. ते मानव हिताचे राजकारण करीत आले आहेत. पवारांनी जातीपातीचे राजकारण कधीच केले नाही. पण, गेले दोन वर्षे या सत्ताधाऱ्यांनी दोन जाती एकमेकांशी भिडवल्या. त्यात यश न आल्याने त्यांनी आता हिंदू-मुस्लीम दंगल भडकावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, असेही ते म्हणाले.

Web Title: ...so who is the real leader of corruption? Amit shah Counterattack by Jitendra Awhad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.