पहिल्या पावसात भिजणे म्हणजे अनेक रोगांना आमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2015 11:31 PM2015-06-15T23:31:14+5:302015-06-15T23:31:14+5:30
कार्बनडाय आॅक्साइड, सल्फरडाय आॅक्साइड आणि नायट्रोजन आॅक्साइड यांच्या पर्यावरणातील वाढत्या प्रभावामुळे पहिला पाऊस हा अॅसिडयुक्त झाला आहे,
भाग्यश्री प्रधान, ठाणे
कार्बनडाय आॅक्साइड, सल्फरडाय आॅक्साइड आणि नायट्रोजन आॅक्साइड यांच्या पर्यावरणातील वाढत्या प्रभावामुळे पहिला पाऊस हा अॅसिडयुक्त झाला आहे, असे डॉक्टरांनी केलेल्या संशोधनात समोर आले आहे.
या पावसात भिजल्यामुळे अनेक रोगांना स्वत:हून आमंत्रण देण्यासारखे आहे. त्यामुळे या पावसात भिजू नये, अशी माहिती असोसिएशन फिजिशियन आॅफ इंडियाचे ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष राजेश पाटील यांनी दिली.
रोगराईपासून तसेच उन्हाळ्यात झालेल्या त्वचारोगावर उपाय म्हणून, उन्हाची काहिली कमी करण्यासाठी पहिल्या पावसात भिजणे सर्वच जण पसंत करतात. मात्र, ही कल्पना २०-२५ वर्षांपूर्वीच मागे पडली आहे.
पूर्वी आभाळही स्वच्छ दिसायचे. अशा पहिल्या पावसात भिजणे उत्तम असते, अशी समजूत तेव्हा होती. मात्र, औद्योगिकीकरणामुळे आता पर्यावरणात अनेक बदल घडत आहेत.
मध्यंतरी डोंबिवली शहरात पडलेला हिरवा पाऊस हाही एक अॅसिडचा प्रकार होता. हा पाऊस पडून गेल्यानंतर डोंबिवलीत रोगराईचे वातावरण पसरले होते.