ठाण्यातील समाजिक कार्यकर्ते एम. डी. भोईर यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 03:41 PM2021-11-23T15:41:26+5:302021-11-23T15:41:49+5:30
भिवंडी येथील पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नत्ती मंडळाचे संस्थापक पद्मश्री अण्णासाहेब जाधव यांच्या सानिध्यात आल्यापासून त्यांच्यासोबतीने ठाणे व पालघर जिल्ह्यात शैक्षणिक व सामाजिक कार्यात झोकून देत काम केले.
भिवंडी - ठाणे व पालघर जिल्ह्यात शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत राहून शिक्षकी पेशातून सेवानिवृत्त झालेले समाजसेवक महादेव दुंदाजी भोईर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या ८१ व्या वर्षी सोमवारी सायंकाळी उपचार दरम्यान रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात तीन मुले एक मुलगी सुना नातवंडे जावई असा मोठा परिवार आहे . शहरातील जेष्ठ पत्रकार संजय भोईर यांचे ते वडील होते .
भिवंडी येथील पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नत्ती मंडळाचे संस्थापक पद्मश्री अण्णासाहेब जाधव यांच्या सानिध्यात आल्यापासून त्यांच्यासोबतीने ठाणे व पालघर जिल्ह्यात शैक्षणिक व सामाजिक कार्यात झोकून देत काम केले. भोईर यांनी शिक्षक म्हणून आपल्या सेवेला सुरुवात करून प्राचार्य पदापर्यंत काम करीत असताना संस्थेच्या विश्वस्त व सरचिटणीस पदाची जबाबदारी सांभाळून सामाजिक कार्य केले. त्याचबरोबर दलित समाजाला संघटित करण्यासाठी देखील परिश्रम घेतले होते.
एम. डी. भोईर यांच्या पार्थिवावर मंगळवारी कामतघर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक मनोज काटेकर, भाजपा शहराध्यक्ष नगरसेवक संतोष शेट्टी, अशोक भोसले, पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नत्ती मंडळाचे अध्यक्ष विजय जाधव, विश्वस्त मंडळ, माजी विद्यार्थी, विविध समाजाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.