पोलिस राखणार सामाजिक बांधिलकी; ठाणे वाहतूक शाखेतर्फे रक्तदान आणि नेत्र तपासणी शिबिर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2021 01:39 PM2021-02-01T13:39:34+5:302021-02-01T13:40:09+5:30
Thane Traffic Police : तीन हात नाका येथील वाहतूक पोलीस उपायुक्त कार्यालयात २ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता हे शिबिर होणार आहे
ठाणे - रस्ते सुरक्षा मोहिमेअंतर्गत ठाणेवाहतूक पोलीसांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले असून यावेळी वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचा-यांसह टीएमटी, ठाणे महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सेवेत कार्यरत असलेल्या वाहनचालकांचे डोळे आणि कानांची (ओडिओमेट्री) तपासणीसुद्धा केली जाणार आहे.
तीन हात नाका येथील वाहतूक पोलीस उपायुक्त कार्यालयात २ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता हे शिबिर होणार आहे. ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन होईल. सह आयुक्त डॉ. सुरेश मेखला, वाहतूक शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील आदी यावेळी उपस्थित राहणार आहेत. सडक सुरक्षा जीवन रक्षा या अभियानाअंतर्गत होणा-या शिबिरांसाठी इंडियन मेडिकल असोसिएशन आणि आधार फाउंडेशनचे सहकार्य लाभले आहे. उपायुक्त कार्यालयात होणा-या शिबिरात वाहतूक शाखेच्या १८ विभागांतील पोलीस कर्मचारी रक्तदान करणार आहेत. इच्छुक ठाणेकर नागरिकांनाही या शिबिरात सहभागी होता येणार आहे.
वाहनांची प्रचंड वर्दळ असलेल्या आणि मोठ्या प्रमाणात प्रदूषण असलेल्या रस्त्यांवर वाहतूक पोलिसांना ड्यूटी करावी लागते. त्याचे विपरीत परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत असतात. त्यामुळे या सर्व पोलीस कर्मचा-यांची कान आणि डोळ्यांची तपासणी करण्याचा निर्णय वाहतूक शाखेने घेतला आहे. त्याशिवाय ठाणे परिवहन सेवा (टीएमटी), ठाणे महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील वाहन चालकांचीसुध्दा तपासणी या शिबिरात होईल, अशी माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी लागू झालेल्या लाँकडाऊनचे निर्बंध आता शिथिल झाले आहे. त्यामुळे दैनंदिन व्यवहार पूर्वपदावर आले आहेत. या काळात कोरोना संक्रमणाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या शिबिरात मास्क वाटपही केले जाणार असल्याचेही वाहतूक शाखेच्या वतीने सांगण्यात आले आहे.