उल्हासनगरात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा; ओमी कलानींच्या हस्ते नगरसेविकेच्या कार्यालयाचं उल्लंघन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 07:33 PM2020-09-14T19:33:25+5:302020-09-14T19:34:06+5:30
प्रशासनाकडून नागरिकांना नियम पाळण्याचं आवाहन; नेत्यांकडून मात्र उल्लंघन
उल्हासनगर: ऐन कोरोना महामारीत सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करत ओमी कलानी यांच्या हस्ते नगरसेविका सविता तोरणे - रगडे व शिवाजी रगडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाले. यावेळी मान्यवरासह अनेकजण उपस्थित होते.
देशासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. तसेच नागरिकांना मास्क घालण्याचे, सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र स्थानिक नेते नियमांचे सर्रास उल्लंघन करत असल्याचे चित्र आहे. समाजसेवक शिवाजी रगडे व ओमी कलानी टीमच्या नगरसेविका सविता तोरणे - रगडे यांच्या कॅम्प नं -३ सम्राट अशोकनगर येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन ओमी कलानी टीमचे प्रमुख ओमी कलानी यांच्या हस्ते रविवारी सायंकाळी करण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमाला अनेक मान्यवरांसह नागरिक एकत्र आले होते. बहुतांश नागरिकांनी व प्रमुख पाहुण्यांनी मास्क न घातल्याने शहरातून टीकेचा भडिमार सुरू झाला आहे.
समाजसेवक शिवाजी रगडे यांनी कोरोना महामारी काळात केलेल्या कामाचे कौतुक होत आहे. कोरोना रुग्णांची सेवा करत असताना त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. असा सामाजिक वारसा असताना, ऐन कोरोना महामारीत जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केल्याने, त्यांच्यासह ओमी कलानी यांच्यावर टीका होत आहे. दरम्यान शहरातील नागरिकांच्या सेवेसाठी व त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कार्यालय उघडल्याचा दावा शिवाजी रगडे यांनी केला. उद्घाटनाला ओमी कलानी यांच्यासह व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुमित चक्रवर्ती, रिपाई नेते महादेव सोनवणे, टीओकेचे प्रवक्ता कमलेश निकम, माजी नगरसेवक सुजित चक्रवर्ती आदीसह स्थानिक नागरिक उपस्थित होते.