ठाण्यामधील बाजारपेठांमध्ये सोशल डिस्टन्सिंगची ऐशीतैशी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2020 01:11 AM2020-06-07T01:11:01+5:302020-06-07T01:11:12+5:30
दुचाकीच्याही रांगा । महापालिका, पोलिसांच्या आवाहनास फासला हरताळ
ठाणे : प्रतिबंधित क्षेत्र वगळता शुक्रवारपासून शहरातील प्रमुख बाजारपेठा खुल्या झाल्या. परंतु, पहिल्या दिवशी पालिकेच्या चुकीच्या आदेशामुळे गोंधळ उडाला होता. त्यानंतर सुधारीत आदेश काढल्यानंतर शनिवारपासून बाजारपेठा खुल्या झाल्या. मात्र, सकाळपासून नागरिकांनी जांभळीनाका, खारकर आळी, स्टेशन रोड, नौपाडा परिसरातील दुकांनांमध्ये गर्दी केली. यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला.
कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊननंतर शहरातील विस्कटलेली अर्थव्यवस्था शुक्रवारपासून सुरू झाली. यात अर्थव्यवहार हे सम आणि विषम तारखेलाच सध्या सुरूराहणार आहेत. त्यातही महापालिके च्या आदेशामुळे पोलीस आणि व्यापााऱ्यांमध्ये संभ्रम होता. अखेर शुक्रवारी सांयकाळी महापालिकेने सुधारीत आदेश काढून तो दूर केला. परंतु, त्यामुळे शुक्रवारी नौपाडा, जांभळीनाका येथील दुकाने बंद करण्यात आली होती. त्यानंतर शनिवारी सम आणि विषण तारखेनुसार दुकाने पुन्हा खुली झाली. या दुकांनामधून सामान घेण्यासाठी ठाणेकरांनी जांभळीनाका, खारखर आळी, नौपाडा भागातील दुकानांमध्ये एकच गर्दी केल्याचे चित्र दिसून आले. यावेळी तोंडाला मास्क लावला असला तरी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत होते. खारकर आळीत तर दुचाकींच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे येथून पायी चालतांनादेखील तारवरची कसरत करावी लागत होती. विशेष म्हणजे ही दुकाने आता नेहमीच खुली राहणार असल्याने नागरिकांनी गर्दी करू नये असे आवाहनही महापालिका तसेच पोलिसांनी केले. मात्र, त्याकडे ठाण्यातील नागरिकांनी कानाडोळ केल्याचेच चित्र होते.
दुकानाची वेळ बदलल्याने व्यापाऱ्यांचा विरोध
अंबरनाथ : नगरपालिकेने दुकानदारांवर निर्बंध लादण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यातच सकाळी ७ ते १२ या वेळेत दुकाने सुरू ठेवण्याचे आदेश काढल्याने त्याला अंबरनाथ व्यापारी संघटनेने विरोध केला आहे. शुक्रवारी पालिकेने नवीन आदेश काढत दुकाने केवळ सकाळी ७ ते १२ पर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश काढले आहेत. मात्र, सकाळी ७ ची वेळ ही योग्य नसल्याचे मत व्यक्त करून व्यापाºयांनी ही वेळ बदलण्याची मागणी केली आहे. या कालावधीत ग्राहक दुकानात येणे शक्य नसल्याचे मत व्यापारी संघटनेचे अध्यक्ष खानजी धल यांनी व्यक्त केले आहे.