सोसायटीत वाहन चार्जिंग पॉइंट हवाच
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 02:32 AM2020-03-21T02:32:44+5:302020-03-21T02:33:42+5:30
सोसायटी वाहनतळात वाहन चार्जिंग पॉइंट हवाच़ प्रश्न फक्त सभासदांच्या मानसिकतेचा आहे व तो बदलण्याची आवश्यकता आहे़ सभासदांची मानसिकता न बदलल्यास न्यायालयाचा पर्याय आहे़
- अॅड. एस. एस. देसाई
माझ्याकडे दुचाकी वाहन आहे़ हे वाहन विजेवर चालते़ या वाहनाला चार्जिंग करावे लागते़ इमारतीच्या वाहनतळात चार्जिंग पॉइंटची आवश्यकता आहे़ तेथे वाहन चार्जिंग केले जाऊ शकते़ मी सोसायटीकडे यासाठी लेखी विनंती केली आहे़ सोसायटी यासाठी नकार देत आहे़ यावर काही उपाय आहे का?
- प्रताप माळी
आपली समस्या सोसायटी पदाधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेण्याची आवश्यकता होती़ परंतु आपले म्हणणे खरे असल्यास हे अत्यंत अयोग्य असे वागणे आहे़ ही बाब खरी आहे की वाहनतळामध्ये चार्जिंग करण्याची सुविधा विकासकाने दिली नसेल़ मात्र ज्या काळी इमारत बांधली गेली होती, तेव्हा विजेवर चालणारे वाहन हे केवळ माहितीपुरते मर्यादित होते़ आता ते वस्तुस्थितीत आहे़ विजेवर चालणारी वाहने ही सद्य:स्थितीत पर्यावरणाची गरज झाली आहेत़ आपण सोसायटीमध्ये याविषयी होणारा खर्च देण्याची तयारी दर्शवावी व स्वखर्चाने तसा पॉइंट व विजेचा चार्जिंग करता येणारा खर्च अदा करण्याची तयारी दर्शवावी़ तसे करूनही जर सोसायटी आपली विनंती अमान्य करीत असेल तर आपण हा विषय सर्वसाधारण सभेमध्ये सर्व सभासदांसमोर मांडावा़ काळाची गरज सर्व सभासदांना पटवून सांगावी़ आपली मागणी सर्वसाधारण सभेमध्ये उचलून धरली जाण्याची शक्यता आहे़ तसे झाल्यास सर्वसाधारण सभा कार्यकारिणीला तसे करण्याचे आदेश देऊ शकते़ आपल्या समस्येचे समाधान होण्याची शक्यता आहे़ अशी स्थितीही होऊ शकते की आपल्या प्रस्तावाला सर्वसाधारण सभा फेटाळू शकते़ अशावेळी आपण वकिलांच्या सल्ल्यानुसार निबंधक कार्यालयाकडे तक्रार दाखल करावी़ या प्रकरणी निबंधक कार्यालय सोसायटीला निर्देश देऊ शकतात़ आपली समस्या योग्य आहे़ प्रश्न फक्त सभासदांच्या मानसिकतेचा आहे व तो बदलण्याची आवश्यकता आहे़ त्यासाठी आपण प्रयत्न करावा़ कारण सोसायटीच्या वाहनतळात चार्जिंग पॉइंट असायला हवा, ती भविष्याची गरज आहे़
माझी आॅटो रिक्षा आहे़ मी सहकारी गृहनिर्माण संस्थेमध्ये राहतो़ माझ्या सोसायटीमध्ये वाहनतळासाठी ठेव घेतात व भाडेसुद्धा घेतात़ सर्व सभासदांना वाहनतळाचे वितरण केले आहे़ मात्र मला माझी आॅटो रिक्षा सोसायटीच्या वाहनतळात ठेवण्यास अटकाव केला जात आहे़ याविषयी काही नियम आहेत का?
- मनोज जावळे
संस्थांचे उपविधी हे आदर्श उपविधी असून सरकारमान्य अशा प्रकारचे आहेत़ या आदर्श उपविधीमध्ये सदनिका ह्या निवासी वापराकरिता आहेत, हे गृहित धरून निवासी वापराकरिता जे काही आवश्यक आहे, त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला आहे़ तसेच या महाराष्ट्रामधील सर्वसामान्य माणूस जो सहकारी संस्थेमध्ये राहतो, तो त्याच्या कुटुंबासह राहतो, असे गृहित धरले आहे़ सबब कुटुंबासाठी लागणारी वाहने म्हणजे मोटार, स्कूटर, सायकल इत्यादी खाजगी वाहनांचाच विचार करून उपविधी बनविले आहेत़ उपविधीमधील वाहनतळासंबंधी असलेल्या तरतुदी व नियम सभासद मोडतात़ सबब उपविधी फक्त नियमांची कारणमीमांसा / उत्तर देण्याचा प्रयत्न करीत आहे़ आपली समस्या ही सध्याची खरी समस्या आहे़ परंतु अशी समस्या असलेल्या व्यक्ती ह्या सोसायटीत कमी आहेत़ सबब आपला आवाज हा आजच्या दिवशी कमजोर आहे़ त्याला सर्व सभासदांचे पाठबळ मिळत नाही़ कारण आॅटो रिक्षा जर वाहनतळात ठेवण्यास मनाई केली तर ती जागा इतर सभासदाला त्याचे दुसरे वाहन ठेवण्यास उपलब्ध करता येईल़ तसेच बहुसंख्य सभासद हे आपल्या बाजूने बोलणार नाहीत़ आपली समस्या ही नियमाला अपवाद आहे़ त्यासाठी संस्थेमध्ये आपणही आपले मत व्यवस्थित मांडले पाहिजे़ जर आपल्या संस्थेमध्ये प्रत्येक सदनिकेस वाहनतळ असेल तर आपल्या सदनिकेच्या वाहनतळातध्ये आपल्या मालकीचे वाहन ठेवण्यासाठी आग्रह धरला पाहिजे़ परंतु हे केवळ आॅटोरिक्षा किंवा टुरिस्ट कार एवढ्यापर्यंतच मर्यादित करता येईल़ आपल्यासारखा सदनिकाधारक वाहनतळ आहे म्हणून लॉरी, ट्रक किंवा मोठे व्यापारी वाहन ठेवण्यास पात्र राहणार नाही़ संस्थेमधील सभासदांना आपली समस्या पटवून देण्याची आवश्यकता आहे़