सोसायट्यांनी वाचला गुन्ह्यांचा पाढा
By admin | Published: June 27, 2017 03:11 AM2017-06-27T03:11:28+5:302017-06-27T03:11:28+5:30
शहराचा मध्यवर्ती व उच्चभू लोकवस्तीच्या नौपाडा परिसरात विविध स्वरूपाच्या चोऱ्यांसह गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. त्या थांबवून
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : शहराचा मध्यवर्ती व उच्चभू लोकवस्तीच्या नौपाडा परिसरात विविध स्वरूपाच्या चोऱ्यांसह गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. त्या थांबवून सुरक्षेच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजनाचा पाढा येथील सुमारे ५० सोसायट्यांमधील नागरिकांनी पोलीस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांच्या बैठकीत वाचला.
नौपाडा पोलिस स्टेशनमध्ये ही बैठक डॉ. स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीला नौपाडा परिसरातील सुमारे ५० सोसायट्यांचे प्रमुख पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावून पोलिसांच्या दुर्लक्षित व निष्काळजीपणाच्या मुद्यावर चर्चा केली. यावेळी पोलिसांना कर्तव्याची जाणीव करून देण्यासह गुन्हे घडण्यास नागरिकांकडून कसे पोषक वातावरण तयार केले जाते, यावर डॉ. स्वामी यांनी उपस्थितांचे प्रबोधन केल्याचे ज्येष्ठ नागरिक व पोलीस मित्र महेंद्र मोने यांनी लोकमतला सांगितले.
नागरिकांच्या तक्रारींचा भडीमार ऐकून ‘ या बैठकीस हजेरी लावणारा प्रत्येक नागरिक हा आमच्यासाठी पोलीस असणार आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधीत ठेण्यासाठी पोलिसांना सर्वतोपरी मदत करा’ अशी भावनिक सादही त्यांनी नौपाडाकरांना घातल्याचे मोने यांनी सांगितले.
यावेळी नौपाडा ीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या चंद्रनगर या वसाहतीला लागून असलेल्या मैदानावर काही तरूण दारू पित असल्याची तक्रारही यावेळी करण्यात आली. याशिवाय पोलीस स्टेशनजवळ असलेल्या गल्लीत बेशिस्तपणे वाहने लावली जातात, परिसरात गुन्ह्याचे व चोरीचे प्रमाण वाढल्याचे उदाहरणादाखल नागरिकांनी तक्रारी केल्या.
यावर तोडगा सांगताना सोसाय्यांमध्ये असलेले वाचमन हे उत्तम दर्जाचे असावेत, पाच हजार रूपये वेतनाच्या वाचमनकडून सुरक्षेची हमी कशी घेता येईल, ठिकठिकाणी सोसायट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, सोसायट्यांनी एकत्र येऊन रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, यामुळे गुन्हेगारीला आळा बसून पोलिसांची जबाबदारी काही अंशी कमी होईल, असे मार्गदर्शन यावेळी उपस्थिताना झाले. यामार्गदर्शनानुसार कोहिनूर सोसायटीच्या व्यवस्थापन समितीने दहा सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे या बैठकीत घोषीत करून तसे लेखी पत्रही पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या नावे दिले.