कोरोनाच्या संशयातून ठाण्यात सोसायटीने केली माय लेकींना बंदी: पोलिसांच्या हस्तक्षेपाने मिळाला प्रवेश
By जितेंद्र कालेकर | Published: March 27, 2020 08:53 PM2020-03-27T20:53:04+5:302020-03-27T20:59:07+5:30
कोरोनाच्या धसक्यामुळे बाहेरील नागरिकांना जशी ग्रामीण भागात गाव बंदी करण्यात आली आहे. तसाच प्रकार शहरी भागातही पहायला मिळत आहे. ठाण्यात एका हवाई सुंदरीला कोरोनाच्या संशयातून एका संपूर्ण सोसायटीनेच प्रवेश बंदीचा प्रकार गुरुवारी केला. अखेर पोलीस आणि शिवसेना पदाधिकाऱ्याच्या हस्तक्षेपानंतर या कुटूंबाला आपल्या घरात येण्याची मुभा देण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: कोरोनाच्या संशयातून ठाण्यातील वर्तकनगर येथील ‘लकी को आॅप. हौसिंग सोसायटी’च्या रहिवाशांनी एका हवाई सुंदरीसह तिची बहिण आणि आईला सोसायटीमध्ये गुरुवारी प्रवेश नाकारला होता. शिवसेना पदाधिकारी आणि वर्तकनगर पोलिसांनी यात हस्तक्षेप केल्याने अखेर या तिघींनाही सोयायटीने प्रवेश दिल्यानंतर सुमारे तासभर चाललेल्या या नाटयावर पडदा पडला.
वर्तकनगर शिवसेना शाखेजवळील म्हाडाच्या इमारत क्रमांक १५ या ‘लकी’ हौसिंग सोसायटीमध्ये ज्युली फर्नांडीस (२४), तिची बहिण मिली (२२) आणि आई शर्मिला (५८, तिघींच्याही नावात बदल आहे) या गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्याला आहेत. ज्युली एका खासगी हवाई वाहतूक सेवेच्या कंपनीत हवाई सुंदरी (एअर होस्टेस) म्हणून नोकरी करते. कामाच्या ठिकाणावरुन नायगाव हे ठिकाण सोयीचे होत असल्यामुळे ती गेल्या अनेक दिवसांपासून आईसह नायगाव येथे वास्तव्याला होती. परंतू, २२ मार्च रोजी जनता कर्फ्यू जाहिर झाला. त्यापाठोपाठ महाराष्ट्रात संचारबंदीही लागू झाली. याच दरम्यान, २१ मार्च रोजी ती ठाण्यातील वर्तकनगर येथील घरी आली. ती हवाई वाहतूक तळावर नोकरीला असल्याने तिला कोरोनाची लागण झाल्याची भीती तिच्या इमारतीमधील रहिवाशांना होती. २१ ते २६ मार्च रोजी ती घरात असतांना तिने सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे तिच्यावर या पदाधिकारी आणि रहिवाशांचा आणखीनच संशय बळावला. त्यांनी तिच्यासह संपूर्ण कुटूंबाने कोरोनाची चाचणी करावी, तरच या सोसायटीमध्ये प्रवेश दिला जाईल, असा पवित्रा २६ मार्च रोजी घेतला. सोसायटीने प्रवेशद्वाराला कुलूपही लावल्याने ज्युली आणि तिची आई हतबल झाली. अखेर जवळच्याच ठाणे महापालिकेच्या डॉ. आनंदीबाई जोशी रुग्णालयाच्या कर्मचा-यांना पाचारण करण्यात आले. या रुग्णालयीन कर्मचारी आणि परिचारिका यांनीही ज्युली आणि तिचे कुटूंबीय कोरोना संशयित नसल्याचा निर्वाळा दिला. तसेच असे बेकायदेशीरपणे या कुटूंबाला सोसायटीबाहेर काढता येणार नसल्याचेही या रुग्णालयीन कर्मचाºयांनी सुनावले. मात्र, कोरोनाची चाचणी झाल्याशिवाय या कुटूंबाला प्रवेश दिला जाणार नाही. कारण इथे ३९ कुटूबीयांच्या आरोग्याचा प्रश्न असल्याची भीती या सोसायटीतील महिलांनी व्यक्त केली. प्रकरण वर्तकनगर पोलीस ठाण्यापर्यंत गेले. हे कुटूंब गेल्या दोन वर्षांपासून इथे वास्तव्य करीत नाही. पण अचानक इथे आल्यामुळे रहिवाशांच्या मनात भीती निर्माण झाल्याचा दावा सोसायटीच्या पदाधिका-यांनी केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड आणि पोलीस हवालदार खोत आणि स्थानिक बीट मार्शल तसेच शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी प्रशांत सातपुते यांनी सोसायटीच्या पदाधिकाºयांना आरोग्य विभाग आणि पोलिसांचा निर्णय मान्य करण्यास सांगून समजूत घातली. त्यानंतर सोसायटीनेही नमते घेत ज्युली आणि तिच्या कुटूबीयांना त्यांच्या घरात तास ते दिड तासाच्या नाटयानंतर घरात प्रवेश दिला. कोरोनामुळे नागरिकांमध्ये अशा प्रकारची नाहक भीती पसरत असल्यामुळेही असेही प्रसंग काहींना अनुभवायला मिळत असल्यामुळे ही वेगळीच चिंता वाढल्याचेही एका पोलीस अधिकाºयाने ‘लोकमत’ला सांगितले.