कृषीउत्पादन वाढीसाठी मृदा आरोग्यपत्रिका; कृषी विभागाचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 03:11 AM2020-12-03T03:11:25+5:302020-12-03T03:11:33+5:30
पाच गावांची निवड, केंद्र व राज्य शासनाच्या सहयोगाने राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत मृदा आरोग्यपत्रिका (सॉइल हेल्थकार्ड) ही योजना हाती घेतली आहे.
ठाणे : शेतकऱ्यांना शेतीतील मातीचा पोत कळावा, उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी मातीपरीक्षण व त्यातील घटकांनुसार पिकांची निवड तसेच खतांची बचत होऊन चांगले पीक घेऊन शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी जिल्हा कृषी विभागाकडून शेतीची काढण्यात येणारी मृदा आरोग्यपत्रिका शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरू लागली आहे.
त्यानुसार यंदादेखील ठाणे जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील पाच गावांची निवड करण्यात आली असून एक हजार ७५१ शेतकऱ्यांच्या शेतीची मृदा आरोग्यपत्रिका तयार करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक कल्याणमधील ४१७ शेतकऱ्यांच्या शेतीची मृदा आरोग्यपत्रिका तयार केल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक अंकुश माने यांनी दिली.
केंद्र व राज्य शासनाच्या सहयोगाने राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत मृदा आरोग्यपत्रिका (सॉइल हेल्थकार्ड) ही योजना हाती घेतली आहे. त्यानुसार, पाच गावांतील सुमारे एक हजार ७५१ खातेदारांच्या शेतीतील मातीचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते.
सर्वच नमुन्यांची तपासणी पूर्ण करून शेतकऱ्यांच्या शेतीची मृदा आरोग्यपत्रिकावाटप करण्यात आली आहे. दरम्यान, २०१६-१७ पासून ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीच्या मृदा आरोग्यपत्रिका काढण्यास सुरुवात करण्यात आली. त्यावेळी एक लाख आठ हजार ९३० काढण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात २०१७ ते २०१९ या कालावधीत एक लाख १४ हजार ५३ शेतीच्या आरोग्यपत्रिका वितरीत करण्यात आल्या, अशी माहिती माने यांनी दिली.
एक हजार ७५१ मृदा नमुने तपासले
२०१९-२० मध्ये त्यात बदल करून प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड करून तेथील शेतकऱ्यांच्या शेतीची आरोग्यपत्रिका वितरीत करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार, ठाणे जिल्ह्यात पाच तालुक्यांतील पाच गावांची निवड करण्यात आली. यामध्ये पाच गावांमधून एक हजार ७५१ मृदा नमुने काढण्यात आले असून त्यांची तपासणी पूर्ण होऊन आरोग्यपत्रिकाही दिल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक अंकुश माने यांनी दिली.