स्वत:भोवतीच फिरणारी सोलर गुढी
By admin | Published: April 8, 2016 01:36 AM2016-04-08T01:36:48+5:302016-04-08T01:36:48+5:30
ऊर्जेची साधने मर्यादित आहेत. इंधनही संपुष्टात येणार आहे. त्यामुळे आपल्याला भविष्यात अपारंपरिक ऊर्जेचा उपयोग करावा लागणार आहे. त्यासाठी सौरऊर्जेचा प्रचार व प्रसार करताना
जान्हवी मोर्ये, डोंबिवली
ऊर्जेची साधने मर्यादित आहेत. इंधनही संपुष्टात येणार आहे. त्यामुळे आपल्याला भविष्यात अपारंपरिक ऊर्जेचा उपयोग करावा लागणार आहे. त्यासाठी सौरऊर्जेचा प्रचार व प्रसार करताना त्याचा प्रत्यक्ष जीवनात वापर करण्याचा संदेश देण्यासाठी येथील स्वाती जोशी यांनी सोलर गुढी तयार केली आहे. त्यांची ही गुढी नववर्ष स्वागतयात्रेचे विशेष आकर्षण आणि चर्चेचा विषय ठरली आहे.
शिव मंदिर परिसरातील जोशी यांचे एम.कॉम.पर्यंत शिक्षण झाले आहे. त्यांचे वडील व भाऊ शिल्पकार. त्यामुळे कलेचा व कल्पकतेचा वारसा त्यांना घरातून मिळाला आहे. त्यांचे पतीही जे.जे. कला महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असल्याने त्यांना त्यांचीही साथ मिळाली. जोशी यांचा स्मृतिचिन्हे तयार करण्याचा व्यवसाय आहे. जोशी यांनी एका दुकानातील सोलर पॅनलचे गिफ्ट विकत घेतले. त्यातून काहीतरी करण्याच्या विचार करून त्यांनी सोलर गुढी तयार केली. ही गुढी सूर्याच्या प्रकाशात ठेवल्यास ३६० अंशांत फिरते. मागील वर्षी नववर्ष स्वागतयात्रेच्या तोंडावर घाईगडबडीत त्यांनी १०० सोलर गुढ्या तयार केल्या होत्या. यंदाच्या वर्षी त्यांनी २७५ सोलर गुढ्या तयार केल्या आहेत. त्या हातोहात विकल्या गेल्या आहेत. एका गुढीसाठी साडेतीनशे ते चारशे खर्च येतो. त्या एक गुढी ५०० रुपयांना विकतात.