विजेच्या धक्क्याने शिपायाचा शाळेत मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 01:06 AM2019-11-15T01:06:09+5:302019-11-15T01:06:12+5:30
शाळेतील तळघरात विजेचा धक्का लागल्याने याच शाळेतील शिपाई राकेश ढोणे (४०) यांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली.
कल्याण : शाळेतील तळघरात विजेचा धक्का लागल्याने याच शाळेतील शिपाई राकेश ढोणे (४०) यांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. बाल दिनानिमित्त कार्यक्रमाची तयारी सुरू असताना ही घटना घडली.
पूर्वेतील नांदिवली परिसरातील तलावाजवळ द्वारका सेमी इंग्लिश स्कूल आहे. या शाळेत बाल दिनानिमित्त गुरुवारी सकाळी १० च्या सुमारास गच्चीवर कार्यक्रमाची तयारी सुरू होती. शाळेतील सर्व शिक्षक आणि कर्मचारी कार्यक्रमाच्या तयारीत व्यस्त होते. कार्यक्रमाच्या ठिकाणी टेबल आणण्यासाठी राकेश खाली गेला होता. यावेळी, अचानक आवाज आल्याने सर्वांनी तळघराकडे धाव घेतली. तेव्हा, राकेश तळघरात असलेल्या पाण्यामध्ये पडल्याचे सर्वांच्या निदर्शनास आले. हा सर्व प्रकार पाहून घाबरलेल्या शिक्षकांनी विद्युतपुरवठा खंडित करीत राकेशला जवळील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. परंतु, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले.
तळघरात असलेल्या पाण्याचा विजेशी संपर्क आल्याने त्याचा धक्का लागल्याने राकेशचा मृत्यू झाल्याचे पोलिसांचे म्हणणे असून याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती कोळसेवाडी पोलिसांनी दिली.