Corona Virus : एकमेव आधार कोरोनाने नेला; पालकांना मदत कोण करणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2021 09:37 AM2021-06-06T09:37:21+5:302021-06-06T09:37:42+5:30
Corona Virus : पालघर जिल्ह्यात आजवर १ लाख ११ हजारहून अधिक लोक कोरोनामुळे बाधित ठरलेले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे यातून १ लाख ६ हजारहून अधिक लोकांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे.
- जगदीश भोवड
पालघर : जिल्ह्यामध्ये आजवर दुर्दैवाने जीवघेण्या कोरोना आजारात २ हजार १३८ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यात काही कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत, तर अनेकांचे आधार गमावले गेले आहेत. यात एकमेव कमावता मुलगा गमावलेल्या कुटुंबांसमोर आता मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या पालकांना मदत कोण करणार, हाच खरा प्रश्न आहे.
पालघर जिल्ह्यात आजवर १ लाख ११ हजारहून अधिक लोक कोरोनामुळे बाधित ठरलेले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे यातून १ लाख ६ हजारहून अधिक लोकांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. परंतु कोरोनाने ज्यांचे एकमेव आधार हिरावून नेले, त्यांची कुटुंबे सध्या हलाखीचे जीवन जगत आहेत. एकीकडे सरकारने आई-वडील मृण पावलेल्या बालकांना मदत करण्याची घोषणा केली आहे. परंतु अशा कुटुंबांना कोण मदत करणार, असा सवाल हे हवालदिल पालक करताना दिसत आहेत.
आधार गमावलेल्या ज्येष्ठांचे प्रश्न वेगळेच...
एकमेव मुलगा अथवा मुलगी वारस असलेली अशी अनेक कुटुंबे जिल्ह्यामध्ये आहेत. या कोरोनाच्या लाटेमध्ये अशा एकमेव आधार असलेल्या मुलगा अथवा मुलीचा बळी जाण्याचेही प्रकार घडलेले आहेत.
उतारवयात ज्यांचा आधार मिळेल, अशी हसती-खेळती कमावती लेकरे गमावलेल्या आई-वडिलांचे दुःख कोण दूर करणार? सरकार अशा निराधारांसाठी योजना जाहीर करणार आहे का? हा प्रश्न विचारला जात आहे.
ज्या आई-वडिलांनी आपला एकमेव कमावता मुलगा अथवा मुलगी कोरोनामुळे गमावली आहे, अशा निराधार कुटुंबीयांना शासनाने आर्थिक मदत करणे नितांत गरजेचे आहे. शिवाय अशा कुटुंबांतील एका व्यक्तीला रोजगार देऊन त्यांना सहाय्य करणे आवश्यक आहे.
- अरविंद देशमुख, वाडा तालुका अध्यक्ष,
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था.