तक्रारींचे निराकरण आता मोबाइलद्वारे
By admin | Published: February 17, 2017 02:04 AM2017-02-17T02:04:24+5:302017-02-17T02:04:24+5:30
महावितरणसंदर्भात असलेल्या अनेक अडचणी आणि समस्या सोडवण्यासाठी महावितरणने मोबाइल आणि ई-मेल माध्यम निवडले
ठाणे : महावितरणसंदर्भात असलेल्या अनेक अडचणी आणि समस्या सोडवण्यासाठी महावितरणने मोबाइल आणि ई-मेल माध्यम निवडले आहे. महावितरणने सुरू केलेल्या मोबाइल एसएमएस सेवेला भांडुप परिमंडळामधून चांगला प्रतिसाद मिळाला असून या सेवेचा लाभ घेता यावा, यासाठी संपूर्ण भांडुप परिमंडळामधून तब्बल ११ लाख ७० हजार ग्राहकांनी आपल्या मोबाइल नंबरची नोंदणी महावितरणकडे केली आहे. यामध्ये ठाणे सर्कलमध्ये ५ लाख ८७ हजार, तर वाशी सर्कलमध्ये तेवढ्याच ग्राहकांनी नोंदणी केली आहे.
महावितरणने एसएमएसवर वीजबिल व वीजपुरवठ्यासंदर्भात माहिती देण्याची सुविधा सुरू केली आहे. सहा महिन्यांपूर्वी या सुविधेला कमी प्रतिसाद मिळाला असला तरी आता बहुसंख्य ग्राहकांनी तिचा लाभ घेण्यास सुरु वात केली आहे. यासाठी ग्राहक केंद्रासोबतच अॅप, संकेतस्थळ व ‘एसएमएस’द्वारे मोबाइल नंबरनोंदणी करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. ग्राहकांचा मोबाइल क्र मांक जर महावितरणकडे नोंद असेल, तर ग्राहकांना त्यांचे वीजबिल एसएमएसद्वारे मिळू शकणार आहे. त्यामुळे एखाद्या वेळेस काही अडचणींमुळे वीजबिल मिळाले नाही किंवा मिळालेले वीजबिल हरवले, तर या एसएमएसचा फायदा ग्राहकांना होणार आहे. तसेच बिल भरण्याची अंतिम तारीख संपत आली असल्यास त्याचीही सूचना एसएमएसद्वारे मिळणार आहे. काही वेळा देखभाल दुरु स्तीसाठी जर महावितरणकडून वीजपुरवठा बंद करण्यात येणार असेल, तर त्याची पूर्वसूचना ग्राहकांना देण्याची सुविधा या एसएमएस सुविधेमध्ये असल्याने याचा चांगलाच फायदा आता वीजग्राहकांना झाला आहे.
महावितरणच्या वतीने सहा महिन्यांपूर्वी या सुविधेला सुरु वात केली होती. या सहा महिन्यांत ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली असल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली. भांडुप परिमंडळामध्ये १७ लाख ३३ हजार ग्राहक असून यापैकी तब्बल ६७.५० टक्के ग्राहकांनी आपल्या मोबाइलची नोंदणी केली आहे. (प्रतिनिधी)