डोंबिवली एमआयडीसीतील समस्या आठ दिवसांत सोडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:40 AM2021-05-14T04:40:05+5:302021-05-14T04:40:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : एमआयडीसी निवासी भागातील एकूण आठ ट्रान्सफॉर्मरसाठी चौथरा, कुंपण बांधणे, खडीकरण, रंगरंगोटी करणे इत्यादी कामे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : एमआयडीसी निवासी भागातील एकूण आठ ट्रान्सफॉर्मरसाठी चौथरा, कुंपण बांधणे, खडीकरण, रंगरंगोटी करणे इत्यादी कामे तातडीने करण्यासंदर्भात स्थानिक पातळीवर पत्राद्वारे गाऱ्हाणे मांडूनही त्यांनी दुर्लक्ष केल्याने अखेरीस डोंबिवली वेलफेअर असोसिएशनने ऊर्जामंत्री कार्यालयाकडे दाद मागितली होती. त्याची दखल घेऊन ऊर्जामंत्र्यांनी आवश्यक ते बदल तातडीने आठ दिवसांत करून नागरिकांना सुविधा द्याव्यात, असे आदेश दिले आहेत.
असोसिएशनने आपल्या पत्रासोबत ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताचे कात्रण व संस्थेच्या लेखी तक्रारींचे पत्र, घटनस्थळावरील फोटो, व्हिडिओ पाठवला होता.
गेल्या वर्षभरात ट्रान्सफॉर्मरला आगी लागण्याचे, स्फोट होण्याचे अशा दुर्घटना होण्याचे प्रमाण वाढले होते. त्याबाबतचे पत्र पाठवल्यावर तेथून आलेल्या उत्तराची माहिती संस्थेचे राजू नलावडे यांनी दिली. त्यात ट्रान्सफॉर्मरची नियमित देखभाल दुरुस्ती होत नसल्याने अनकेदा दुर्घटना होऊन कित्येक तास वीजपुरवठा खंडित होतो. त्यात महावितरणच्या मालमत्तेचे नुकसान होते. शिवाय या ट्रान्सफॉर्मर्सच्या बाजूला इमारती, बंगले असल्याने त्यातील रहिवासी असुरक्षित वातावरणात राहात होते. याचा फटका थेट महावितरणला बसत असून, विविध माध्यमातील वृत्तांमुळे महावितरणबद्दलची प्रतिमा खराब होत असल्याचे निदर्शनास आणले होते.
त्यानुसार आगामी काळात आठ ठिकाणच्या ट्रान्सफॉर्मर परिसरात कुंपण फेन्सिंग, खडीकरण करणे, झाडझुडपं काढून टाकणे, महावितरणच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार तीन ठिकाणी चौथरा उंची वाढवणे आणि सहा ठिकाणी रंगरंगोटी करणे आदी सूचना अभियंता विभागाला केल्या आहेत. पावसाळा तोंडावर आला असल्याने ही सर्व कामे शक्यतो जूनच्या पहिल्या पंधरवड्यापूर्वी पूर्ण करावीत, अशी मागणी संस्थेचे विवेक देशपांडे, नलावडे यांनी महावितरणकडे केली आहे.
लोकमतचे संस्थेने मानले आभार
संस्थेच्या वतीने नलावडे यांनी लोकमत वृत्तपत्राचे आभार मानले आहेत. एमआयडीसीच्या रहिवाशांना पायाभूत सुविधांसाठी सतत येणाऱ्या समस्यांची तातडीने दखल घेऊन वृत्तपत्रात त्याविरोधात आवाज उठवण्यात येतो. लोकमतचा येथील नागरिकांना आधार वाटत असल्याचे ते म्हणाले.
-------------------