नांदिवलीतील पाणी साचण्याची समस्या तातडीने सोडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:33 AM2021-07-25T04:33:17+5:302021-07-25T04:33:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : पूर्वेतील नांदिवली भागात दरवर्षी पावसात साचणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यासाठी त्वरित उपाययोजना करावी, असे आदेश ...
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : पूर्वेतील नांदिवली भागात दरवर्षी पावसात साचणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यासाठी त्वरित उपाययोजना करावी, असे आदेश खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नुकतेच दिले होते. त्यानुसार श्री स्वामी समर्थ मठ परिसरात शनिवारपासून काम सुरू झाले आहे.
नांदिवली येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. या समस्येबाबत स्थानिक नागरिकांनी शिंदे यांच्याकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेत शिंदे यांच्या सूचनेनुसार केडीएमसीने शनिवारी सकाळी ९ वाजेपासून कामाला प्रारंभ केला. शिवसेना मध्यवर्ती शाखा आणि स्थानिक पदाधिकारी यांच्या देखरेखीखाली मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने समर्थनगर येथे ५० सफाई कामगार, दोन जेसीबी, सक्शन मशीनद्वारे गाळ काढून पाण्याचा निचरा होण्यासाठी प्रयत्न करण्याचे काम सुरू झाले. पाणी साचते तिथे गटारे तोडून नवीन चेंबर तयार करणे, अरुंद नाले रुंद करण्याचे तातडीचे काम सुरू आहे. मनपाच्या निधी कमतरतेमुळे अनेक दिवस येथील कामे खोळंबली आहेत. ही कामे व पावसाळ्यानंतर रोड आणि नाल्यापर्यंत पाण्याचा निचारा होण्यासाठी उपाययोजनेचे नियोजन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
-----------