‘त्या’ हत्येचे गूढ उकलले, अनैतिक संबंधातून पतीला संपवले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 08:41 AM2024-01-30T08:41:45+5:302024-01-30T08:42:11+5:30
Dombivali: बेपत्ता असलेल्या चंद्रप्रकाश लोवंशी यांचा मृतदेह हत्या केलेल्या आणि अंगाला दगड बांधलेल्या अवस्थेत २५ जानेवारी रोजी आडीवली गाव, नेताजीनगर परिसरातील विहिरीत आढळला होता. दरम्यान, या हत्येचे गूढ उकलण्यात मानपाडा पोलिसांना यश आले आहे.
डोंबिवली - बेपत्ता असलेल्या चंद्रप्रकाश लोवंशी यांचा मृतदेह हत्या केलेल्या आणि अंगाला दगड बांधलेल्या अवस्थेत २५ जानेवारी रोजी आडीवली गाव, नेताजीनगर परिसरातील विहिरीत आढळला होता. दरम्यान, या हत्येचे गूढ उकलण्यात मानपाडा पोलिसांना यश आले आहे. पत्नी रिता हिने प्रियकर सुमित विश्वकर्मा याच्या मदतीने पती चंद्रप्रकाशची हत्या केल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी रिता हिच्यासह सुमितला अटक केली आहे, तर त्याच्या दोन अल्पवयीन मित्रांना ताब्यात घेतले आहे.
चंद्रप्रकाशची अतिशय क्रूर आणि निदर्यपणाने हत्या केली गेली आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत टाकला होता.
४ महिन्यांपूर्वी रचला कट
चंद्रप्रकाशला संपविण्यासाठी दोघेजण चार महिन्यांपासून कट रचत होते. २० जानेवारी ही तारीख निश्चित केली गेली. सुमितने आपल्या अल्पवयीन मित्रांच्या मदतीने चंद्रप्रकाशला जबरदस्तीने कारमध्ये घातले आणि आडीवली येथील निर्जनस्थळी नेऊन धारदार शस्त्राने खून करून त्याच्या मृतदेहाला भला मोठा दगड लावून तो विहिरीत फेकून दिला.
चंद्रप्रकाश बेपत्ता असल्याबाबतची तक्रार २१ जानेवारीला मानपाडा पोलिस ठाण्यात पत्नी रिता हिने दिली होती. त्यामुळे मृतदेह आढळून येताच चौकशीअंती तो चंद्रप्रकाशचा असल्याचे समोर आले. पत्नी रिताची चौकशी केली असता ती काहीतरी लपवत असल्याचा संशय आला आणि या गुन्ह्याची उकल झाली.