कोपरी पुलाखालील काही भाग निखळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 12:57 AM2019-04-13T00:57:47+5:302019-04-13T00:58:01+5:30
अपघाताची शक्यता : मनसेचा आंदोलनाचा इशारा
ठाणे : मुंबईत पादचारी पूल कोसळल्यानंतर ठाण्यात कोपरी पुलाची पाहणी करून मनसेने या पुलाच्या धोक्याबाबत सूचनाही केली होती. परंतु, त्यानंतरही तो वाहतुकीसाठी खुलाच आहे. राष्टÑवादीनेही यासंदर्भात थेट आव्हान दिले होते. परंतु, आता मात्र या पुलाच्या खालील बाजूचा थोडा स्लॅब कोसळला असून त्याठिकाणी तात्पुरता सिमेंटचा मुलामा चढवला आहे.
ठाणे व मुलुंडदरम्यान रेल्वेलाइनवर कोपरी पूल १९५८ साली सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधला होता. त्याच्या दोन्ही बाजूंना ४ बाय ४ मार्गिकेचा रस्ता असून पूल दोन मार्गिकांचा असल्याने नेहमी वाहतूककोंडी होत होती. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने २००३ साली रेल्वेकडे पूल रुंदीकरण मंजुरीसाठी प्रस्ताव सादर केला. या कामासाठी २५८ कोटी लागणार होते. याचवेळी रेल्वेने एसीचे डीसीमध्ये रु पांतरण करण्याचे ठरवल्यामुळे कोपरी पुलाची उंची वाढवावी लागणार असल्याने रेल्वेनेही खर्चाचा भार उचलावा, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाने केली. रेल्वेकडे निधी उपलब्ध नसल्याने या कामास विलंब झाला. २२ जून २०१७ ला या पुलाचा स्लॅब कोसळला होता. रेल्वेने हा पूल धोकादायक झाल्याचे २६ डिसेंबर २०१३ ला पालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग व वाहतूक शाखा यांना कळवले होते. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी या पुलाखालील स्लॅबचा काही भाग कोसळला होता. परंतु, केवळ सिमेंटचा लेप मारण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, आता हा लेप लगेच निघाल्याने त्याच्या लोखंडी सळया स्पष्ट दिसू लागल्या आहेत. त्यामुळे हा पूल धोकादायक स्थितीत आला आहे.
काही दिवसांपूर्वी मनसेने पाहणी करून भविष्यात काही दुर्घटना झाली, तर त्याला सर्वस्वी जबाबदार हे प्रशासन असेल, असेही स्पष्ट केले होते. राष्टÑवादीनेसुद्धा याविरोधात आवाज उठवला होता. मात्र, त्यानंतर हे पक्ष शांत झाले.