काही केले, काही करायचे राहून गेले - संजीव जयस्वाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 12:16 AM2019-01-13T00:16:00+5:302019-01-13T00:16:20+5:30
आयुक्तपदाची चार वर्षे : नव्या वर्षात नवे संकल्प
ठाणे : गेल्या चार वर्षांत या शहरासाठी सतत काहीतरी करायचा प्रयत्न केला असला, तरी अजूनही काही करायचे बाकी राहून गेले असल्याची कबुली महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शनिवारी दिली. महापालिका आयुक्त म्हणून चार वर्षांचा मोठा टप्पा पूर्ण करताना त्यांनी नवीन वर्षातील नवीन कामांची आखणी करण्यासाठी आयोजित केलेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
गेल्या चार वर्षांत आपण लोकहिताच्या, शहराच्या विकासाच्या विविध योजना हाती घेतल्या. त्यातील योजना प्रगतीपथावर आहेत, तर काही सुरू झाल्या, परंतु संथगतीने सुरू आहेत. काही योजना विविध कारणांमुळे अद्यापही सुरू झाल्या नसल्या, तरी त्या प्रामाणिकपणे या वर्षात सुरू करता येतील का किंवा करताच येणार नसतील, तर तसे मान्य करून त्याऐवजी नवीन काही योजना राबवता येतील का, याचा विचार करता येईल, असेही त्यांनी प्रांजळपणे कबूल केले. ठाणे शहरासाठी मी जे काही करायचा प्रयत्न केला, तो प्रामाणिकपणे आणि निष्ठापूर्वक करण्याचा प्रयत्न केला आहे.
आपण सर्वांनी यापुढेही त्याच निष्ठेने आणि प्रामाणिकपणे समाजाप्रति काम करण्याचे आवाहन जयस्वाल यांनी सर्व अधिकाºयांना करतानाच काही करायचेही राहून गेले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच हे करण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी, नागरिकांनी साथ दिली, त्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. आपली निष्ठा नागरिकांप्रति असल्याचे सांगून यापुढे सामाजिक आणि लोकहिताच्या कामांना प्राधान्य देण्यात येईल, असे सांगून संबंधित विषय फेब्रुवारीच्या महासभेत मंजुरीसाठी पाठवण्याच्या सूचना त्यांनी अधिकाºयांना दिल्या.