"माफी मागायची नौटंकी..."; आनंद आश्रमात पैसे उधळल्याच्या प्रकारावर संजय राऊतांचा संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2024 09:19 AM2024-09-15T09:19:22+5:302024-09-15T09:24:37+5:30
Anand Dighe Ashram : आनंद दिघे यांच्या आश्रमातील सगळ्या प्रकारावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तीव्र शब्दात रोष व्यक्त केला.
Sanjay Raut : शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमात पैशांच्या उधळण झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला. टेंभी नाक्यावरील आनंद आश्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे काही पदाधिकारी नोटा उधळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. या घटनेनंतर विरोधकांकडून शिंदे गटावर टीका केली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सगळ्या प्रकरणी माफी मागितली पाहिजे अशी मागणी ठाकरे गटाने केली. तर पदाधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. या सगळ्या प्रकारावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तीव्र शब्दात रोष व्यक्त केला. कोणी माफी मागत असेल तर ही पूर्णपणे नौटंकी आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख दिवगंत आनंद दिघे यांच्या टेंभी नाक्यावरील आनंद आश्रमात शिंदेच्या शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांचा धक्कादायक प्रकार समोर आला.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे श्रद्धास्थान असेलल्या आनंद दिघे यांच्या ठाण्यातील आश्रमात काही पदाधिकाऱ्यांनी ढोल वाजवणाऱ्या लोकांवर नोटा उधळल्या. नोटांची उधळण करणाऱ्यांची मुख्यमंत्री शिंदेंनी पक्षातून हकालपट्टीही केली. यावरुन आता खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.
"ज्या शिवसेनेला पहिली सत्ता मिळवून दिली असं सुस्कृंत शहर आहे ठाणे. ठाण्यात शिवसेनेने अनेक नेते उभे केले. धर्मवीर आनंद दिघे त्या वास्तूत लोकांना न्याय द्यायचे. त्या वास्तूमध्ये मिंधे सेनेच्या लोकांनी लेडीज बारमध्ये नाचतात आणि पैसे उधळतात त्या पद्धतीने उपक्रम साजरा केला. अत्यंत विचलित करणारे चित्र आहे. आनंद दिघे जिथे बसत होते त्या भिंतीवर चाबूक लावलं होतं. त्या चाबूकाचा अर्थ चुकाल तर ते पाठीवर पडेल. अनेकांना त्या चाबूकाचे फटके पडलेले आहेत. जर आनंद दिघे असते तर त्यांनी असे कृत्य करणाऱ्यांना चाबकाने टेंभी नाक्यावर फोडून काढलं असतं. एकतर तुम्ही बेकादेशीरपणे आनंदाश्रमाचा ताबा घेतला. मूळात ती शिवसेनेची आनंद दिघेंची मालमत्ता आहे. अशा पद्धतीचे कृत्य करुन ठाण्यातल्या लोकांची मान खाली आणली. ही मिधेंचे सरदार आहेत त्यांची संस्कृती आहे. याच्यावर कोणी माफी मागत असेल तर ही पूर्णपणे नौटंकी आहे," असं खासदार संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, आनंद आश्रमतील प्रकरणावरून एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली होती. “मी ते पाहिलं. त्याची चौकशी होईल. ज्याने असा प्रकार केलाय त्याला पक्षातून काढून टाकणार. त्याच्यावर कारवाई करणार,” असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. त्यानंतर संबधित पदाधिकाऱ्यांवर कारवाई करुन कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.