कुणाचा मानसिक कोंडमारा, तर कुणी रंगलं कुटुंबात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2020 12:51 AM2020-10-01T00:51:17+5:302020-10-01T00:51:31+5:30

घरातच अडकलेल्या वृद्धांची मनोवस्था : कोरोना, लॉकडाऊनमुळे जगणे झाले कंटाळवाणे

Someone's mental anguish, while someone's color in the family | कुणाचा मानसिक कोंडमारा, तर कुणी रंगलं कुटुंबात

कुणाचा मानसिक कोंडमारा, तर कुणी रंगलं कुटुंबात

Next

स्रेहा पावसकर ।

ठाणे : लॉकडाऊनचा फटका जसा नोकरदारांसह व्यावसायिकांना आर्थिकदृष्ट्या बसला तसेच बहुतांश घरातील वयोवृद्धांनाही जराही घराबाहेर पडता येत नसल्याने त्यांना मानसिक फटका बसला आहे. एरव्ही घरातील एकटेपणा घालवण्यासाठी घराबाहेर पडणारे काही वृद्ध मात्र मुले, नातवंडे घरीच असल्याने त्यांच्यामध्ये ते रमताना दिसत आहेत.

घरातील वृद्ध व्यक्ती ही एकप्रकारे संपत्ती असते. मात्र, अनेक घरात ती अडचण ठरते. कौटुंबिक वाद, अपुऱ्या जागेमुळे घरातील वृद्धही मग आपले मन रमवण्यासाठी घराबाहेर पडतात. मग, दिवसातून दोनवेळा वॉकसाठी जाणे, मन:शांतीसाठी मंदिरात जाऊन बसणे, समवयस्करांशी गार्डन, कट्ट्यांवर गप्पा मारणे, वृद्धांसाठी चालणाºया विविध उपक्रमांत सहभागी होणे किंवा नातेवाइकांना भेटणे, या गोष्टी मोठ्या प्रमाणावर करतात. मात्र, मार्चपासून लॉकडाऊनने या सगळ्या गोष्टी पूर्णपणे बंद झाल्या. कोरोनाची वयस्कर व्यक्तींना अधिक भीती असल्याने त्यांना घरातून बाहेर पाठवणेच अनेकांनी बंद केले. त्यांचे वॉक, गप्पा हे सारे काही बंद झाल्याने अनेक वयोवृद्धांचे शारीरिक आणि मानसिक संतुलनही बिघडले. कोरोनाने बहुतांश वृद्धांचे जगणे कंटाळवाणे झाले आहे. तर, यापूर्वी आपल्या कामात, क्लासेसमध्ये व्यस्त असणारी मुले, नातवंडे या लॉकडाऊनमध्ये पूर्णवेळ घरात असल्याने काही घरांत वृद्ध आजीआजोबा आणि नातवंडे, पतवंडे यांच्यात एकप्रकारचे बाँडिंग निर्माण झालेलेही दिसले.

वयस्कर व्यक्तींना वॉकला जाण्याची, आपल्याच वयाच्या लोकांशी गप्पा मारण्याची एक सवय झालेली असते. त्यात ते बºयाचदा रमतात, आनंदी असतात. एकप्रकारे हे रूटीन झालेलं असतं. मात्र, लॉकडाऊनमुळे या सगळ्या गोष्टी बंद झाल्याने त्यांची चीडचीड होणे, मानसिक संतुलन बिघडल्याने झोप कमी होणे, स्थूलपणा वाढणे अशा समस्या उद्भवलेल्या दिसत आहेत. तर, सकारात्मक दृष्टीने पाहता सर्वच माणसं घरात असल्याने वृद्धांबरोबर चांगला वेळ घालवला जात आहे.
डॉ. समिक्षा जाधव-पोळ, मानसोपचारतज्ज्ञ, शासकीय जिल्हा रुग्णालय, ठाणे
 

Web Title: Someone's mental anguish, while someone's color in the family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे