म्हाडा सोडतीत कहीं खुशी, कहीं गम; ८९८४ घरांसाठी निघाली सोडत, ठाणे जिल्ह्यातील ८१२ घरांसाठी २ लाख ७ हजार अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2021 07:52 AM2021-10-15T07:52:23+5:302021-10-15T07:52:45+5:30
Mhada Lottery: कोकण गृहनिर्माण क्षेत्रविकास मंडळातर्फे कल्याण, मीरारोड, विरार, नवी मुंबई, सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्ह्यातील विविध गृहप्रकल्पांतर्गत उभारलेल्या ८ हजार ९८४ सदनिकांच्या विक्रीकरिता प्राप्त अर्जांची संगणकीय सोडत गुरुवारी ठाण्यात प्रथमच पार पडली.
ठाणे : कोकण गृहनिर्माण क्षेत्रविकास मंडळातर्फे कल्याण, मीरारोड, विरार, नवी मुंबई, सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्ह्यातील विविध गृहप्रकल्पांतर्गत उभारलेल्या ८ हजार ९८४ सदनिकांच्या विक्रीकरिता प्राप्त अर्जांची संगणकीय सोडत गुरुवारी ठाण्यात प्रथमच पार पडली. यापूर्वीच्या सोडती मुंबईतच होत होत्या. या घरकुलांसाठी यंदा सर्वाधिक २ लाख ४६ हजार ६५० अर्ज दाखल झाले होते. त्यामुळे कोणाचे नशीब उघडणार याबाबत उत्सुकता होती. कोरोनामुळे ही सोडत ऑनलाइन पद्धतीने काढण्यात आली. यासाठी ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात ५०० अर्जदारांना हजर राहण्याची परवानगी देण्यात आली होती. गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत ही सोडत काढण्यात आली. सोडतीदरम्यान काहींच्या तोंडावर हसू, तर काहींच्या तोंडावर निराशा दिसून आली. ठाणे जिल्ह्यातील ८१२ घरांसाठी २ लाख ७ हजार नागरिकांनी अर्ज केले होते.
दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर नागरिकांना हक्काच्या घराचे शुभ वर्तमान मिळावे, यासाठी तुतारीच्या निनादात सोडत काढली जात होती. जे सोडतीला हजर राहिले त्यांना म्हाडाची ट्रॉफी देऊन त्यांचे स्वागत तुतारीच्या निनादात करण्यात आले. त्यामुळे ज्यांना घराची लॉटरी लागली त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. यावेळी ३२ देशांतील नागरिक सोडत ऑनलाइन पद्धतीने पाहत असल्याचेही सांगण्यात आले. या कार्यक्रमाला जितेंद्र आव्हाड, पालकमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील, आमदार रवींद्र फाटक, मुंबई इमारत पुनर्वसन मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.
प्रथमच संगणकीय पद्धतीचा वापर
संगणकीय पद्धतीने अतिशय पारदर्शक पद्धतीने ही सोडत सुरू असल्याचे यावेळी उपस्थित नागरिकांनी सांगितले. याठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त होता. एकूण ८,९८४ घरांपैकी ८१२ घरे ही ठाणे जिल्ह्यात होती. प्राप्त झालेल्या एकूण २ लाख ४६ हजार ६५० अर्जापैकी ठाणे जिल्ह्यासाठी तब्बल २ लाख ७ हजार नागरिकांनी अर्ज केल्याची माहिती कोकण मंडळाचे मुख्याधिकारी डॉ. नितीन महाजन यांनी दिली. ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधील सदनिकांकरिता ही सोडत काढण्यात आली होती.