कहीं खुशी कही गम!
By admin | Published: May 27, 2017 02:11 AM2017-05-27T02:11:52+5:302017-05-27T02:11:52+5:30
भिवंडी महापालिकेसाठी बुधवारी मतदान झाल्यानंतर कुणाची सत्ता येणार याचीच चर्चा शहरात तसेच शुक्रवारी मतमोजणी केंद्राबाहेर सुरू होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी / अनगाव : भिवंडी महापालिकेसाठी बुधवारी मतदान झाल्यानंतर कुणाची सत्ता येणार याचीच चर्चा शहरात तसेच शुक्रवारी मतमोजणी केंद्राबाहेर सुरू होती. सकाळी दहाला जरी मतमोजणी सुरू होणार असली तरी कार्यकर्त्यांनी सकाळपासूनच निकाल ऐकण्यासाठी गर्दी केली होती. उन्हाच्या तडाख्यातही कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने पाणीविक्रेत्यांची चांदी झाली होती. निकालापूर्वीच्या शांततेचे जल्लोषात रूपांतर होत होते. आपला उमेदवार विजयी झाल्याचा आनंद एका बाजूला साजरा होत असताना दुसरीकडे पराभूत उमेदवारांच्या चेहऱ्यावरील नाराजीही दिसत होती. त्यामुळे मतदानकेंद्राबाहेर कही खुशी कही गम असेच वातावरण होते. दरम्यान, गर्दीला आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.
मिल्लतनगरमधील फरहान हॉल, भादवडमधील संपदा नाईक हॉल, कामतघर येथे वऱ्हाळादेवी हॉल, धोबीघाट येथील अल्हाजशाह मोहम्मद, कोंबडपाडा येथील गाजेंगी हॉल या ठिकाणी मतमोजणी झाली. सर्व केंद्राबाहेर बघ्यांची गर्दी झाली होती. प्रत्येक उमेदवाराच्या प्रतिनिधीने दुचाकी आणल्याने मतमोजणी हॉलबाहेर मोठ्या संख्येने दुचाची उभ्या केल्या होत्या. मतमोजणीच्या ठिकाणी महापालिकेने पिण्याच्या पाण्याची सोय केली नव्हती. कर्मचाऱ्यांकडून पाण्याच्या बाटल्या मागून घ्याव्या लागत होत्या. भादवड येथील संपदा नाईक हॉलमध्ये पिण्याचे जार ठेवले, पण त्यासाठी ग्लासच नव्हते. जवळजवळ सर्व ठिकाणी भरउन्हात पोलीस कर्मचारी व उमेदवारांचे पिण्याच्या पाण्यावाचून हाल झाले. पत्रकारांसाठी सहायक निवडणूक अधिकारी सुनील भालेराव यांनी बसण्याची सोय न केल्याने हॉलच्या बाहेर पत्रकारांना उन्हात ताटकळत उभे रहावे लागले. तर पत्रकारांना मोबाइलही आतील पत्रकार कक्षापर्यंत नेण्यास पोलिसांनी मनाई केली होती.
मतमोजणी केंद्राबाहेर २५ रूपयांचा हार ५० ते १०० रूपयांपर्यंत विकला गेला. कार्यकर्ते विजयी उमेदवारांचे हार घालून स्वागत करत होते. विजयी उमेदवारांच्या कार्यालयाजवळ फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी
कोबडपाडा, निजामपुरा, शांतीनगर, अण्णा भाऊ साठेनगर, रावजीनगर, वंजारपट्टीनाका, इस्लामपुरा, पिरानीपाडा, वेताळपाडा, पटेलनगर, न्हावीपाडा या ठिकाणी काँग्रेस तर कामतघर, भादवड, टेमघर, नवीवस्ती येथे शिवसेनेच्या, ताडाली, पद्मानगर, धामणकरनाका, मानसरोवर या विभागात भाजपा कार्यकर्ते यांनी फटाके वाजवून तसेच गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला. विजयी उमेदवाराला कार्यकर्ते खांद्यावर उचलत होते. काही उमेदवारांनी बंदी आदेश मोडत छोट्या मिरवणुकाही काढल्या. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मतमोजणी केंद्राच्या परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.