झोपेत असतानाच जावयावर कुऱ्हाडीने केला वार; पैशाच्या वादातून सासऱ्याचे धक्कादायक कृत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 19:07 IST2025-04-09T19:05:57+5:302025-04-09T19:07:53+5:30
पालघरमध्ये सासऱ्याने जावयाची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

झोपेत असतानाच जावयावर कुऱ्हाडीने केला वार; पैशाच्या वादातून सासऱ्याचे धक्कादायक कृत्य
Palghar Crime:पालघरमध्ये सासऱ्याने जावयाची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पैशाच्या व्यवहारावरून झालेल्या वादातून ७५ वर्षीय वृद्धाने त्याच्या जावयाची कुऱ्हाडीने हत्या केली आणि नंतर पळ काढला. वाडा येथे सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा सगळा प्रकार घडला. मृत व्यक्ती लोकांना नोकरी देण्याचे आश्वासन देऊन पैसे घ्यायचा पण तो कधीही तो पूर्ण करत नव्हता. याच व्यवहारातून हा सगळा प्रकार घडल्याचे समोर आला आहे.
मृत व्यक्तीने त्याच्या सासऱ्याकडूनही पैसे घेतले होते. मात्र पैसे परत न दिल्याने दोघांमध्ये अनेकदा भांडणे देखील झाली होती. दोन महिन्यांपूर्वी, अशाच याच भांडणात, आरोपीने जावयावर विळ्याने हल्ला केला होता. त्यानंतर याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोमवारी मध्यरात्री आरोपी सासरा जावयाच्या घरी गेला. जावई गाढ झोपेत असताना आरोपी सासऱ्याने त्याच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला आणि तिथून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आणि आरोपी सासऱ्याचा शोध सुरु केला.
पोलिसांनी मृताच्या नातेवाईकाच्या तक्रारीच्या आधारे आरोपी सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी मंगळवारी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) अंतर्गत एफआयआर नोंदवला. मात्र, आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
दुसरीकडे, पालघरमध्ये एका नेपाळी युवकाने लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या प्रेयसीची हत्या केली होती. यामध्ये आरोपीला त्याच्या वडिलांनीच मदत तेल्याचे समोर आलं. आरोपी तरुणाने त्याच्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या करून तिचा मृतदेह नदीत फेकून दिला. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या तरुणाचे नाव राजकुमार वराही (२४) आहे. त्याचे काजोल गुप्ता (२६) नावाच्या तरुणाशी संबंध होते. ती नेपाळमधील जनकपूरची रहिवासी होती. दोघेही गेल्या अडीच वर्षांपासून एकत्र राहत होते. काजोल राजकुमारवर लग्नासाठी दबाव आणत होती. यामुळे कंटाळून आरोपीने त्याचे दोन साथीदार सुरेश रामशोबितसिंह (५०) आणि बालाजी अशोक वाघमारे (३४) यांच्या मदतीने हत्येचा कट रचला. २७ मार्च रोजी राजकुमार काजोलसोबत ट्रेनने वापीला आला. ३१ मार्च रोजी, त्र्यंबकेश्वर मंदिरातून परतत असताना, जंगलात त्यांनी काजोलची हत्या केली आणि मृतदेह एका पोत्यात भरून नदीत फेकून दिला होता.
१ एप्रिल रोजी पालघरमधील मोखाडा परिसरातील वाघ नदीत एका महिलेचा मृतदेह पोत्यात सापडला होता. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. मृतदेह असलेल्या पोत्यावर SM28 लिहिलेले होते. पोलिसांच्या तपासात अशी पोती हिमाचल प्रदेशातील शिमला येथून गुजरातमधील वापी येथे आणण्यात आल्याचे समोर आलं. पालघर पोलिसांनी वापी पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर मृत महिला ही काजोल गुप्ता असून तिला एका मंदिरात पाहिल्याचे एका व्यक्तीने सांगितले. त्यानंतर पोलीस राजकुमारपर्यंत पोहोचले.