गाणी, डान्स, एकपात्रीतून आजीआजोबांनी उडवली धम्माल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 12:06 AM2018-07-22T00:06:03+5:302018-07-22T00:06:27+5:30

ठाण्यात रंगली जवानी-दिवानी स्पर्धा : २०० स्पर्धकांचा सहभाग, ९२ वर्षांच्या आजोबांनी सादर केलेली गाणी ठरली हिट

Songs, dance, singing with granddaughter | गाणी, डान्स, एकपात्रीतून आजीआजोबांनी उडवली धम्माल

गाणी, डान्स, एकपात्रीतून आजीआजोबांनी उडवली धम्माल

googlenewsNext

ठाणे : ५८ वयापासून ९२ वर्षांपर्यंतच्या आजीआजोबांनी गाणी गात, डान्स, एकपात्री सादर करून एकच धम्माल उडवून दिली. सैगल, पंकज मलिक यांच्या गाण्यांपासून ते अगदी तम्मा तम्मा, बत्तमीज दिल, यापर्यंतची सगळी गाणी सादर केली. ९२ वर्षांच्या डी. बी. भाटिया यांनी ‘एक राज का बेटा लेकर’, ‘आयी बहार...’ ही दोन गाणी सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले. उपस्थितांनी त्यांना टाळ्यांची भरभरून दाद दिली.
इनरव्हील क्लब आॅफ ठाणे, ठाणे नॉर्थ एण्ड, ठाणे गार्डन सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी ५८ वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांसाठी जवानी-दिवानी स्पर्धा आयोजित केली होती.
यावेळी गाणे, नृत्य, एकपात्री अभिनय, वेशभूषा, चित्रकला, निबंध, बेस्ट आजीआजोबा स्पर्धा घेण्यात आल्या. यात जिल्ह्यातील दोनशेहून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता. सुरुवातीला सोलो आणि ग्रुप सिंगिंग स्पर्धा पार पडली. यात जवळपास सत्तरहून अधिक स्पर्धकांनी भाग घेऊन जुनीनवीन, हिंदीमराठी गाणी सादर केली. ५९ वर्षांचे दृष्टिहीन असलेले प्रदीप म्हाळगी यांनी ‘दुनिया रंगरंगिली’ हे गाणे सादर केले. मी संगीताचे कोणतेही शिक्षण घेतले नाही. परंतु, गाणी ऐकून शिकलो. पहिल्यांदाच अशा स्पर्धेत सहभागी झाल्याचे ते म्हणाले. यावेळी लावण्याही सादर झाल्या. नृत्य स्पर्धेत तर आजीआजोबांनी धम्माल उडवली. होठों पे ऐसी बात, लुंगी डान्स या गाण्यांवर डान्स केला. विशेष म्हणजे हावभावानेच प्रेक्षकांची मने जिंकली. वेशभूषा स्पर्धेत ज्येष्ठांनी उत्साहाने भाग घेतला होता. ६७ वर्षांच्या सुहासिनी भालेराव यांनी सावित्रीबाई फुले यांची, ७२ वर्षीय माधव धामणकर यांनी किंसिंग कपल अशी वेशभूषा तसेच कोयना भूकंपावर आधारित एकपात्री प्रयोग करून त्यात मानसिक आजाराने ग्रस्त असल्याची भूमिका, ६० वर्षांच्या अनुराधा मेहेंदळे यांनी पुतळाबाई, तर ६३ वर्षांच्या सीमा अग्रवाल यांनी मदर तेरेसांची वेशभूषा साकारली. प्रत्येक स्पर्धेतून पाच जण निवडले जाणार असून या स्पर्धेची अंतिम फेरी पुढच्या शनिवारी गडकरी रंगायतन येथे पार पडणार आहे, असे समन्वयक आरती कुलकर्णी यांनी सांगितले.
यावेळी ठाणे नॉर्थ एण्डच्या अध्यक्षा मनीषा कोंडसकर, शोभा नायर, ठाणे गार्डन सिटीच्या अध्यक्षा डॉ. प्रतिभा गुप्ते, ‘इनरव्हील’च्या अध्यक्षा अमला परदेशी, समन्वयक अश्विनी गोखले आदी उपस्थित होते.
 

Web Title: Songs, dance, singing with granddaughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे