आदिवासी ८ हजार गर्भवतींची सोनोग्राफी
By admin | Published: October 29, 2015 11:20 PM2015-10-29T23:20:28+5:302015-10-29T23:20:28+5:30
जिल्ह्यातील आदिवासी, दुर्गम भागांतील गरोदर मातांना सोनोग्राफीची मोफत सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हा परिषदेकडून योग्य पावले उचलली आहेत.
ठाणे : जिल्ह्यातील आदिवासी, दुर्गम भागांतील गरोदर मातांना सोनोग्राफीची मोफत सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हा परिषदेकडून योग्य पावले उचलली आहेत. मात्र, रुग्णालयात मशीन असूनही हाताळणीसाठी तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने आरोग्य विभागाने या मातांना खाजगी रुग्णालयातून सोनोग्राफी करण्यास सुचवले होते. त्यानुसार, मागील सहा महिन्यांत जिल्ह्यातील ८ हजार २७० मातांनी खाजगी रुग्णालयातून सोनोग्राफी तपासणी केल्याचे बिल सादर केले आहे. त्यानुसार, प्रति गरोदर मातेला ६०० रु पयांचे अनुदान प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय त्यांच्या संख्येनुसार वितरीत केले आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात सोनोग्राफीमुळे गर्भस्थ कुपोषित शिशूंची माहिती मिळवून त्यांच्यावर वेळीच औषधोपचार करता यावेत. तसेच अहवालाद्वारे अपंगत्वाची जाणीव होताच ते दूर करण्यासाठी प्रयत्न करता यावेत . यासाठी जिल्हा परिषदेने हा सोनोग्राफीची मोफत सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी चालू आर्थिक वर्षात सुमारे एक कोटी २५ लाखांची तरतूद केली आहे.
आरोग्य विभागाचे उल्हासनगर जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टर अंबरनाथ आणि कल्याण परिसरातील गर्भवती मातांची मोफत सोनोग्राफी करतात. तसेच या परिसरातील गर्भवती मातांसाठी शासकीय रु ग्णालयात उपचारासाठी जाण्यास मोफत रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून दिली आहे. तर, सोनोग्राफी करणाऱ्या डॉक्टरांना दिवसाला चार हजार रु पयांचे मानधन देऊन आठवड्यातून दोन दिवस ही सुविधा सुरू आहे. शहापूर येथील रु ग्णालयात सोनोग्राफी मशीन आहे. परंतु, ती हाताळण्यासाठी रेडिओलॉजिस्ट च नाही. त्यामुळे ती बंद आहे. ती हाताळणाऱ्या डॉक्टरांना प्रतिदिन पाच हजार मानधन देण्याचे निश्चित केले असतानाही त्यासाठी डॉक्टर मिळत नाही. त्यावर तोडगा म्हणून या मातांना सोनोग्राफी करण्यासाठी अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयानंतर सहा महिन्यांत ८ हजार २७० मातांनी आरोग्य विभागाशी संपर्क साधला. त्यानुसार, या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय मातांच्या संख्येनुसार ६०० रुपयांचे अनुदान दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी बी.एस. सोनावणे यांनी दिली. (प्रतिनिधी)