सवलतीच्या दरात आदिवासी,गरीब गरोदर महिलांना सोनोग्राफी सुविधा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 04:07 AM2019-02-05T04:07:15+5:302019-02-05T04:07:45+5:30
अलिबाग जिल्ह्यात चालू असलेल्या कुपोषण निर्मूलन मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व खासगी सोनोग्राफी सेंटर चालक डॉक्टरांनी माफक, कमीत कमी दरात आदिवासी व गरीब गरोदर महिलांची सोनोग्राफी चाचणी करून द्यावी
अलिबाग - जिल्ह्यात चालू असलेल्या कुपोषण निर्मूलन मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व खासगी सोनोग्राफी सेंटर चालक डॉक्टरांनी माफक, कमीत कमी दरात आदिवासी व गरीब गरोदर महिलांची सोनोग्राफी चाचणी करून द्यावी, अशा केलेल्या आवाहनास जिल्ह्यातील सर्व खासगी सोनोग्राफी सेंटर चालक डॉक्टरांनी सामाजिक बांधिलकीतून सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आदिवासी व गरीब गरोदर महिलांना सवलतीच्या केवळ ४०० रुपये दरात सोनोग्राफी सुविधा उपलब्ध करून देण्याचे मान्य केले आहे. परिणामी येत्या काळात आदिवासी व गरीब गरोदर महिलांना ही सुविधा माफक दरात उपलब्ध झाल्याने जिल्ह्यात प्रसूतीदरम्यान होणारे माता व बाल मृत्यू रोखणे शक्य होईल असा विश्वास रायगडचे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला आहे.
सोमवारी जिल्हास्तरीय गर्भलिंगनिदान विरोधी कायदा अंमलबजावणी समितीच्या बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी, दिशाकेंद्राचे कार्यकर्ते अशोक जंगले, जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील खासगी सोनोग्राफी सेंटरचे डॉक्टर्स उपस्थित होते.
आम्ही जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने मागच्या वर्षात कर्जत तालुक्यात कुपोषण निर्मूलन मोहीम राबवली होती, या मोहिमेचा चांगला परिणाम समोर आला आहे. डिसेंबर २०१७ मध्ये २०० च्या आसपास असलेला कुपोषणाचा आकडा सद्यस्थितीत १२ मुलांवर आला आहे. या मोहिमेची जिल्हाभर अंमलबजावणी करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांनी घेतला होता. मोहीम यशस्वी करण्यासाठी गरोदर महिलांची सोनोग्राफी होणे गरजेचे होते. संयुक्त बैठकीमध्ये सर्वांनी माफक दरात तपासणी करण्याचे मान्य केले ही आनंदाची बाब असून कुपोषण निर्मूलनासाठी त्यामुळे निश्चित गती मिळणार आहे.
- अशोक जंगले, सामाजिक कार्यकर्ते