साडेपाच हजार गर्भवती महिलांच्या सोनोग्राफीसाठी ५५ लाखांची तरतूद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2020 02:03 AM2020-02-20T02:03:31+5:302020-02-20T02:04:16+5:30
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचा पुढाकार : सर्वसाधारण सभेची मंजुरी
सुरेश लोखंडे
ठाणे : आर्थिक समस्येमुळे ग्रामीण, आदिवासी, दुर्गम भागातील गर्भवती महिलांना सोनोग्राफी टेस्ट करणे शक्य होत नाही. यामुळे सुयोग्य उपचाराअभावी महिलेसह नवजात बालकाच्या जीवितास धोका संभवतो. तो टाळण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने जिल्ह्यातील पाच हजार ५०० महिलांना सोनोग्राफीच्या बिलाची रक्कम व प्रवासभाडे देण्यासाठी तब्बल ५५ लाख रुपयांची तरतूद केली असून तिला नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजुरी मिळाली आहे.
जिल्ह्यातील आदिवासी, दुर्गम भागात जिल्हा परिषदेची ६४ प्राथमिक आरोग्य केंदे्र कार्यरत आहेत. त्यामध्ये वर्षभरात २६ हजार गरोदर मातांची नोंदणी होत आहे. पण, या महिलांच्या सोनोग्राफीसाठी ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयांमध्ये सोनोग्राफी होत नाही. खाजगी रुग्णालयात ती करण्यासाठी आर्थिक समस्येमुळे महिला या तपासणीस मुकत आहेत. या गरजेच्या तपासणीकडे लक्ष केंद्रित करून जिल्हाभरातील सुमारे पाच हजार ५०० महिलांसाठी ५५ लाखांची तरतूद जिल्हा परिषदेने केली.
या सोनोग्राफी तपासणीमुळे जिल्ह्यातील या जोखमीच्या गर्भवती माता, जन्मत: व्यंग, जुळी मुले, बाळाची वाढ इत्यादी बाबींचे वेळीच निदान होणे शक्य आहे. या महिलांच्या परिसरातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार किमान एक सोनोग्राफी तपासणी करण्याची अपेक्षा आहे. यासाठी २०१९-२० या कालावधीत सोनोग्राफी तपासणीसाठी लागणाºया ८०० रुपयांच्या खर्चासह या सोनोग्राफी केंद्रावर जाण्यासाठी २०० रुपये गाडीभाडे देण्याची जि.प.ने तरतूद केली आहे. त्यास नुकतीच मंजुरी मिळाल्यामुळे या गर्भवती महिलांच्या सोनोग्राफी तपासणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
अशी आहे तालुकानिहाय मंजुरी : जिल्ह्यातील या पाच हजार ५०० महिलांसाठी सोनोग्राफी तपासणीकरिता ८०० प्रमाणे सुमारे ४४ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित धरला आहे. याशिवाय, सोनोग्राफी सेंटरवर जाण्यासाठी लागणाºया २०० रुपये प्रवासखर्चानुसार ११ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. यानुसार, ५५ लाख रुपये या महिलांच्या सोनोग्राफी तपासणीवर खर्च केला जाणार आहे.
या लाभासाठी शहापूर तालुक्यातील एक हजार ८०० महिलांकरिता १८ लाख रुपयांची तरतूद आहे. तर, अंबरनाथच्या पाच महिलांकरिता पाच लाख, कल्याणच्या ५०० महिलांसाठीदेखील पाच लाख, भिवंडी तालुक्यातील एक हजार ५०० महिलांकरिता १५ लाख आणि मुरबाड तालुक्यातील एक हजार २०० गर्भवती महिलांसाठी १२ लाख रुपये खर्चास मंजुरी मिळाली आहे.