रिंग रोडचे ७० टक्के काम होताच केडीएमसीकडे होणार हस्तांतरित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:44 AM2021-01-16T04:44:16+5:302021-01-16T04:44:16+5:30

कल्याण : कल्याण-डोंबिवलीतील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या रिंग रोड प्रकल्पाचे दुर्गाडी ते मांडा-टिटवाळादरम्यानचे ७० टक्के काम मार्गी लावून ते ...

As soon as 70% of the ring road is completed, it will be transferred to KDMC | रिंग रोडचे ७० टक्के काम होताच केडीएमसीकडे होणार हस्तांतरित

रिंग रोडचे ७० टक्के काम होताच केडीएमसीकडे होणार हस्तांतरित

Next

कल्याण : कल्याण-डोंबिवलीतील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या रिंग रोड प्रकल्पाचे दुर्गाडी ते मांडा-टिटवाळादरम्यानचे ७० टक्के काम मार्गी लावून ते टप्प्याटप्प्याने एप्रिल, मे महिन्यात कल्याण-डोंबिवली मनपास एमएमआरडीएकडून हस्तांतरित केले जाणार आहे.

रिंग रोड प्रकल्पबाधितांच्या प्रश्नासंदर्भात डिसेंबरमध्ये शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली होती. त्यानंतर गुरुवारी भोईर यांनी रिंग रोडची पाहणी केली. या वेळी प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता जयवंत ढाणे, नगररचनाकार रघुवीर शेळके, टेक्नो कंपनीचे प्रकल्प सल्लागार, माजी शिवसेना नगरसेवक जयवंत भोईर उपस्थित होते. प्रकल्पाआड येणारी अतिक्रमणे, घरे, शेतजमिनी, मंदिरे यांची माहिती भोईर यांनी अधिकाऱ्यांकडून घेतली. काही ठिकाणी रस्ता १० ते ५ मीटर रुंद आहे. तेथे जागामालकांनी जागा सोडलेली नाही, असे लक्षात आले.

दुर्गाडी ते टिटवाळादरम्यान आटाळी, आंबिवलीनजीक ८५० घरे रस्त्याआड येत असून, त्यांना मोबदला हवा आहे. मात्र, चाळवजा घरे जागामालकांनी दुसऱ्यांना विकली आहेत. सातबारा जागामालकाच्या नावे आहे. मोबदला जागा मालकाला देताना त्याला दुप्पट एफएसआय द्यावा, अशी सूचना भोईर यांनी केली होती. त्यातील एक एफएसआय हा मालक वापरणार, तर दुसरा एफएसआय चाळीतील घरांना द्यावा. चाळी तयार असतील तर तेथे बाधितांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी जागा मालकाची आहे. बाधितांच्या पुनर्वसनाच्या हमीशिवाय जागामालकास मोबदला दिला जाऊ नये, असे त्यांनी प्रशासनास बजावले आहे. प्रकल्पातील अडचणींवर तोडगा काढण्यासाठी आयुक्तस्तरावर बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती भोईर यांनी दिली आहे.

१२ किलोमीटरचे काम युद्धपातळीवर

रिंग रोड प्रकल्पाचे सात टप्पे आहेत. त्यापैकी टप्पा क्रमांक ४ ते ७ दुर्गाडी ते मांडा-टिटवाळा हे १७ किलोमीटर अंतराचे काम आहे. त्यातील १२ किलोमीटरचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम पूर्ण करून ते टप्प्याटप्प्याने एप्रिल - मे महिन्यापासून केडीएमसीला हस्तांतरित केले जाणार आहे.

फोटो : १५ कल्याण-रिंग रोड पाहणी

ओळ : रिंग रोडच्या कामाची पाहणी करताना आमदार विश्वनाथ भोईर.

-----------------------------

Web Title: As soon as 70% of the ring road is completed, it will be transferred to KDMC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.