ठाण्यातील कोरोना रुग्णालयांत रुग्णांसाठी समुपदेशकांची लवकरच नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2020 05:18 PM2020-08-30T17:18:46+5:302020-08-30T17:18:55+5:30
कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने सतर्कता बाळगावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
ठाणे : कोरोनाचा धसका घेतल्यामुळे रुग्णांची मानसिक स्थिती बिघडत असल्याच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील रुग्णालयांमध्ये पालिकेच्या वतीने समुपदेशकांची (कौन्सलर) नियुक्ती करण्यात येईल, असे आश्वासन आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिले आहे, असे आमदार निरंजन डावखरे यांनी सांगितले.
कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबद्दल नागरिकांना दिलासा देण्यासंदर्भात आयुक्तांना भाजपाच्या वतीने शुक्रवारी निवेदन दिले, त्यावेळी त्यांनी समुपदेशकांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिल्याचे डावखरे यांनी सांगितले. आयुक्तांना भेटलेल्या शिष्टमंडळात भाजपाचे नेते किरीट सोमैय्या, नगरसेवक नारायण पवार, मनोहर डुंबरे यांची उपस्थित होते, असेेेहीह डावखरे यांनी
लक्षात आणून दिले. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर रुग्णांची मानसिक स्थिती बिघडल्याची काही उदाहरणे आढळली आहेत. कोरोना संदर्भात रुग्णांची काळजी घेतली जाते. मात्र, त्यांच्यावर रुग्णालयात मानसिक उपचार होत नाहीत. रुग्णालयातील वातावरणामुळे रुग्णांच्या मनावर विपरीत परिणाम होत आहे, याकडे आमदार डावखरे यांनी आयुक्तांचे लक्ष लक्ष वेधले आहे.
पालिकेच्यावतीने रुग्णालयांमध्ये समुपदेशकांची नियुक्ती करण्यात येईल. पीपीई किट घालून समुपदेशकांकडून प्रत्येक रुग्णाशी संवाद सादला जाईल, असे आश्वासन डॉ. शर्मा यांनी दिले.
कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने सतर्कता बाळगावी, कोरोना रोखण्यासाठी सध्या वापरात येणाऱ्या रेमडेसिवीर, टोसिझूमैब औषधांचा साठा पालिकेने मागवावा, खाजगी रुग्णालयांमध्ये सुरू असलेली रुग्णांची लूट रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात आदी मागण्या भाजपाच्या वतीने यावेळी आयुक्तांकडे करण्यात आल्या आहेत.