उमेदवारी जाहीर होताच मनसे उमेदवाराने घेतलं स्व.आनंद दिघेंच्या शक्तिस्थळाचं दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2019 09:36 PM2019-10-01T21:36:49+5:302019-10-01T21:37:47+5:30
ठाणे जिल्ह्यात धर्मवीर आनंद दिघे यांना मानणारा मोठा वर्ग आहे.
ठाणे - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पहिली उमेदवार यादी जाहीर झाली आहे. यामध्ये ठाणे शहरातून जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पक्षाकडून उमेदवारी जाहीर होताच मनसे कार्यकर्त्यांसह उमेदवार अविनाश जाधव यांनी दिवंगत धर्मवीर आनंद दिघे यांच्या समाधीचे दर्शन घेतलं.
ठाणे जिल्ह्यात धर्मवीर आनंद दिघे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. ठाणे जिल्ह्यात शिवसेना वाढविण्यात आनंद दिघे यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. आनंद दिघे यांच्या शक्तिस्थळाचं दर्शन घेताना मनसे उमेदवार अविनाश जाधव आणि मनसे कार्यकर्ते भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं. ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून अविनाश जाधव निवडणूक लढवित आहे.
ठाणेकरांच्या अनेक भावना आनंद दिघे यांच्या शक्तिस्थळाशी जोडल्या आहेत. आनंद दिघे यांनी ठाणेकरांना जी उर्जा दिली आहे. तो झंझावात दिघेंनी ठाण्यात उभा केला होता. त्यामुळे हे संपूर्ण ठाणेकरांसाठी शक्तिस्थळ आहे. ठाणेकरांचं दैवत असलेलं आनंद दिघे यांच्या दर्शनाने नक्कीच एक नवीन उर्जा मिळाली आहे. आनंद दिघेंच्या आशीर्वादाने नक्कीच निवडून येणार अन् जिंकून आल्यावर सर्वात आधी शक्तिस्थळाचं दर्शन घेणार असल्याचं उमेदवार अविनाश जाधव यांनी सांगितले.
दरम्यान ठाणे शहर मतदारसंघ युतीमध्ये भाजपाच्या वाट्याला गेला आहे. त्यामुळे अनेक शिवसैनिक नाराज आहे. या मतदारसंघात विद्यमान आमदार संजय केळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे असं सांगत मतदारसंघ शिवसेनेलाच सोडावा यासाठी अनेक शिवसैनिकांनी राजीनाम्याची तयारी दर्शविली होती. त्यामुळे ठाणे शहरातील या मतदारसंघात कोण बाजी मारणार हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईल.
Vidhan Sabha 2019: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची 27 जणांची पहिली यादी जाहीर @mnsadhikrut#महाराष्ट्रविधानसभानिवडणूकhttps://t.co/NDM0YhrhcI
— Lokmat (@MiLOKMAT) October 1, 2019