ठाणे जिल्ह्यातील ४१६ गांवांमधील महसूलच्या दप्तराची लवकरच ‘ई चावडी’ प्रणाली; अधिकार्यांना आँनलाईनचे धडे!
By सुरेश लोखंडे | Published: November 4, 2022 10:00 PM2022-11-04T22:00:58+5:302022-11-04T22:01:14+5:30
या ई चावडी प्रणालीमध्ये कोणत्या प्रकारे नोंदी कराव्यात, त्यासाठी कोणती माहिती व कशा प्रकारे अद्ययावत करावी, संगणकीकृत सातबारा व ई फेरफारमध्ये ई चावडीचा उपयोग आदी विषयी यावेळी नरके यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले.
ठाणे : महसूल विभागासंबंधीच्या कामकाजात एकसूत्रपणा येऊन सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाकडून सर्वसामान्यांसाठी ‘ई चावडी’ प्रणाली प्रकल्प राबविण्यात येत आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ४१६ गावांमधील महसूल दफ्तर अद्ययावत करण्याचे काम महसूल यंत्रणांनी प्राधान्याने करण्याचे आदेश ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी आज अधिकाºयांना दिले.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तलाठी, मंडळ अधिकारी व कर्मचाºयांसाठी डिजिटल इंडिया भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमा अंतर्गत जिल्हा प्रशासनाने ‘ई चावडी’ व ‘ई हक्क’ विषयक जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा आज घेतली. त्यावेळी उपस्थित अधिकाºयांना शिनगारे यांनी मार्गदर्शन केले. ई फेरफार समन्वयक तथा अपर जिल्हाधिकारी सरिता नरके यांनी ई चावडी व ई हक्क प्रणालीविषयक प्रशिक्षण अधिकाºयांना दिले. यावेळी अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे, उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे, अविनाश शिंदे, अभिजित भांडे पाटील, जयराज कारभारी, बाळासाहेब वाकचौरे, रोहित राजपूत आदी उपस्थित होते.
या ई चावडी प्रणालीमध्ये कोणत्या प्रकारे नोंदी कराव्यात, त्यासाठी कोणती माहिती व कशा प्रकारे अद्ययावत करावी, संगणकीकृत सातबारा व ई फेरफारमध्ये ई चावडीचा उपयोग आदी विषयी यावेळी नरके यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले. यावेळी शिनगारे यांनी ई चावडी व ई हक्क प्रणालीचे महत्त्व विषद केले. या प्रणालीमुळे महसूल प्रशासनाचे कामकाज पारदर्शक व गतिमान होण्यास मदत होईल. त्याचबरोबर नागरिकांनाची सोय होणार आहे. यासाठी जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यात घेण्यात आलेल्या गावांची माहिती ई चावडीसाठी आवश्यक अष्टसूत्रीनुसार अद्ययावत तातडीने सुरूवात करण्याचे आदेश शिनगारे यांनी देऊन मार्गदर्शन केले. येत्या डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील सर्वच गावे ई चावडीवर येण्यासाठी प्रयत्न करू. राज्य शासनाच्या दृष्टीने हे प्रकल्प महत्त्वाचे असल्याचे पुढील काळात याचा तालुका निहाय आढावा घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात संगणकिकृत सातबारा प्रकल्प राबविण्यात आला होता. आता शंभर टक्के ई फेरफार हे आॅनलाईन होत आहे. आता त्याची पुढची पायरी म्हणून ई चावडीद्वारे महसूलविषयक आकारणीची माहिती अद्ययावत होत आहे. ई हक्क प्रणालीमुळे नागरिकांना घरबसल्या वारसा नोंद, ई करार, बोजा चढविणे, बोजा उतरविणे, मयताचे नाव कमी करणे, शेरा कमी करणे, एकत्र कुटुंब नोंद कमी करणे, विश्वस्ताचे नाव कमी करणे ही कामे करता येणार आहेत. हस्तलिखित व संगणकिकृत सातबारामधील तफावत दूर करण्यासाठी ई हक्कद्वारे अर्ज करता येणार आहे. खातेदारांना त्यांची माहिती आॅनलाईन अद्ययावत करण्याची सोय यामध्ये देण्यात आल्याचे नरके यांनी सांगितले.