तीस मीटरचा गर्डर बसवताच पाेहाेचरस्त्याचे काम - श्रीकांत शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2020 12:38 AM2020-11-23T00:38:56+5:302020-11-23T00:39:29+5:30
७६ मीटर गर्डरवर बेस लोखंडी पत्रा व त्यावर सिमेंट काॅंंक्रिटीकरण करून रस्ता तयार करण्यात येणार आहे. सध्या अस्तित्वात असलेला पत्रीपूल आणि जुना पत्रीपूल यांच्या मधाेमध या पुलाचे काम सुरू आहे.
कल्याण : पत्रीपुलाच्या गर्डरचे काम सुरू असतानाच ९० फुटी रस्त्याच्या पाेहाेचरस्त्याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यावर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी, ७६ मीटर लांबीच्या गर्डरचे १० टक्के काम शिल्लक आहे. ते पूर्ण होताच २७ व २८ नोव्हेंबरला पुन्हा रेल्वे मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्यावेळी आणखी एक ३० मीटरचा गर्डर ठेवला जाणार आहे. त्यासाठी २४०० बोल्ट वापरलेले आहेत. हा गर्डर ठेवल्यावर पत्रीपुलाच्या पाेहाेचरस्त्याचे (ॲप्राेच राेड) काम केले जाणार आहे.
७६ मीटर गर्डरवर बेस लोखंडी पत्रा व त्यावर सिमेंट काॅंंक्रिटीकरण करून रस्ता तयार करण्यात येणार आहे. सध्या अस्तित्वात असलेला पत्रीपूल आणि जुना पत्रीपूल यांच्या मधाेमध या पुलाचे काम सुरू आहे. तसेच जुन्या पत्रीपुलाच्या जागेवर आणखी एक पूल तयार केला जाणार आहे. त्यासाठी लागणाऱ्या गर्डरचे कामही ग्लोबल कंपनीला दिलेले आहे. सध्या सुरू असलेले काम पूर्णत्वास येताच दुसऱ्या पत्रीपुलाच्या कामाला सुरुवात हाेणार आहे. दोन्ही पूल तयार झाल्यानंतर कल्याण-शीळ रस्त्यावर सहापदरी पूल होईल, असे खासदार शिंदे यांनी सांगितले. पाेहाेचरस्ताही महत्त्वाचा आहे, पण ही सर्व कामे टप्प्याटप्प्यांनी करावी लागणार असल्याचे ते म्हणाले.
...म्हणून घेतला दिवसा मेगाब्लाॅक
राज्य रस्ते विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अभियंता शशिकांत सोनटक्के म्हणाले की, ७०० टनांचा गर्डर बसवण्यासाठी दोन दिवस मेगाब्लाक घेतला. दिवसा ब्लॉक घेण्याऐवजी रात्री का घेतला नाही, असे विचारण्यात येते. इतका मोठा गर्डर पुढे सरकवताना तो सरळ रेषेत जात आहे की नाही, याची पाहणी करणे तसेच कामातील बारकावे रात्री तपासणे शक्य झाले नसते. त्यासाठी दिवसा ब्लॉक घेतला. हा गर्डर टाकण्यासाठी जे सपोर्ट लावले आहेत, ते काम पूर्ण झाल्यावर पहाटे २ ते ५ वाजेपर्यंत काढले जातील. कामात कुठलीही चूक होऊ नये, यासाठी गर्डर टाकण्याची दोनदा ट्रायल घेतली गेली. ट्रायलमध्ये १.२ मीटर गर्डर सरकवून पाहिल्यावर प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली.