इजिप्तहून माल येताच कांदा आला जमिनीवर; सामान्यांना दिलासा, दर झाले कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2020 12:35 AM2020-12-04T00:35:23+5:302020-12-04T00:35:38+5:30
ऑक्टोबरमध्ये कांद्याने शंभरी गाठली होती. त्यामुळे सर्वसामान्यांच्या डोळ्यांत कांद्याने अश्रू आणले होते. जुना कांदा संपत आल्याने आणि नवीन कांदा बाजारात न आल्याने कांद्याचे दर वाढतच होते.
ठाणे : गेल्या अनेक दिवसांपासून शंभरीच्या उंबरठ्यावर अडून बसलेल्या कांद्याचे दर आता कमी झाले आहेत. इजिप्त आणि तुर्कस्तान येथून कांद्याची आवक झाल्याने दल कमी होऊन सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, विदेशी कांद्यापेक्षा भारतीय कांद्याला ग्राहक पसंती देत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
ऑक्टोबरमध्ये कांद्याने शंभरी गाठली होती. त्यामुळे सर्वसामान्यांच्या डोळ्यांत कांद्याने अश्रू आणले होते. जुना कांदा संपत आल्याने आणि नवीन कांदा बाजारात न आल्याने कांद्याचे दर वाढतच होते. त्यामुळे सर्वसामान्यांनी फक्त गरजेपुरती कांद्याची खरेदी केली होती. नोव्हेंबर महिन्यात कांद्याचे दर थोडेफार कमी झाले असले, तरी खरेदीला उठाव नव्हता. परंतु, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात कांद्याचे दर कमी झाल्याने कांद्याला उठाव आहे. त्यामुळे एरव्ही अर्धा किलो कांदे खरेदी करणारे, अडीचतीन किलो कांद्याची खरेदी करीत आहेत, असे कांदा विक्रेत्यांनी सांगितले. जुना कांदा पुणे, नाशिक, नगर येथून येत आहे. तर नव्या कांद्याचीही आवक सुरू झाली आहे.
तुर्कस्तान, इजिप्त येथून येणाऱ्या कांद्याचे दर २५ ते ३५ रुपये किलो असल्याने भारतीय कांद्याचे दर कमी झालेत. भारतीय कांदा स्वस्त झाल्याने याच कांद्याला ग्राहक पसंती देत आहेत.- संदीप चौधरी, कांदे व्यापारी