पालकमंत्र्यांचा दौरा संपताच पालिका प्रशासनाने फिरविली पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:45 AM2021-05-25T04:45:50+5:302021-05-25T04:45:50+5:30
चक्रीवादळाचा फटका अंबरनाथ तालुक्यालादेखील बसला होता. या वादळात झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दौरा केला. पालकमंत्री ...
चक्रीवादळाचा फटका अंबरनाथ तालुक्यालादेखील बसला होता. या वादळात झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दौरा केला. पालकमंत्री येणार म्हणून बारकुपाडा परिसरातील फासेपारधी वस्तीमधील घरांवर पडलेल्या वृक्षांची छाटणी सुरू करण्यात आली होती. मात्र, पालकमंत्री यांचा दौरा संपताच धोकादायक वृक्ष आहे त्या स्थितीत ठेवून पालिका प्रशासन निघून गेले. गेल्या तीन दिवसांपासून याबाबत सतत पाठपुरावा करूनदेखील पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप या भागातील सामाजिक कार्यकर्ते सुधीर जाधव यांनी केला आहे. अनेक घरांचे नुकसान झाले असून, काही घरांचे छत क्षतीग्रस्त झाले आहे. अनेक घरांवर वृक्षांच्या फांद्या अडकल्या असून, त्या कधीही पडू शकतात, अशी स्थिती आहे. त्यामुळे वादळ गेल्यावरही या भागातील नागरिकांचा जीव टांगणीलाच आहे.
मंत्री आले म्हणून बारकुपाडा भागात अनेक अधिकारी येऊन गेले. मात्र, मंत्र्यांचे आदेश धुडकावून या भागात पुन्हा पालिका प्रशासन फिरकलेच नाही, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. बारकुपाड्याला लागलीच मदत पोहोचवावी असे आदेश पालकमंत्र्यांनी दिले होते. मात्र मदत तर सोडाच, परंतु पालिका प्रशासनाने घरांवर पडलेले वृक्षदेखील हटविले नाहीत. धोकादायक स्थितीत असलेल्या या घरांमधील रहिवासी हे सुधीर जाधव यांच्या कार्यालयात वास्तव्यास आले आहेत. परिसरातील सामाजिक कार्यकर्ते मदत करीत असताना पालिका प्रशासन मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
----------
फोटो आहे.